गोव्यातील कामगार चळवळ

0
64
  • शरत्चंद्र देशप्रभू
    (माजी मजूर आयुक्त)

या चळवळीत नावीन्याची, नवनिर्माणाची आत्यंतिक गरज आहे. परंतु या चळवळीतील प्रवर्तकांनी औद्योगिक स्थितीचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. कारण उद्योगाच्या अस्तित्वावरच कामगारांचे अन् कुटुंबीयांचे अस्तित्व अवलंबून असते. आर्थिक संदर्भ, राजकीय रंग, मागणी-पुरवठ्यातील अनिश्‍चितता, गतिमान तंत्रज्ञान, उद्योजकांची तशीच कामगारांची मानसिकता, बाह्य घटकांचा प्रभाव, अर्थसाहाय्याचे स्रोत यांचा वेध घेऊन आनुषंगिक बदल धोरणात अन् संघटन शैलीत करणार्‍या, आदर्शवाद अन् अस्तित्ववाद यांचा बेमालूम संयोग असलेल्या सक्षम कामगार चळवळीची आज गरज आहे.

भारतात कामगार चळवळीला उज्ज्वल परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच कामगार चळवळीची मुहूर्तमेढ देशात रोवली गेली. परंतु गोव्यात संघटना-स्वातंत्र्य तसेच मूलभूत हक्कांचा संकोच प्रतीत होत होता. १९१० साली जरी पोर्तुगालमध्ये प्रजासत्ताक राज्याची पहाट उजाडली तरी नंतर आलेल्या सालाझारशाहीमुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर बरेच निर्बंध आले होते. गोवा ही पोर्तुगालची वसाहत असल्यामुळे इथल्या प्रशासनपद्धतीने राष्ट्रीय धोरणाचे अनुकरण करणे स्वाभाविक होते. शिवाय गोव्यात औद्योगिकीकरणाची पण वानवा होती. खनिज व्यवसाय व त्या अनुषंगाने आलेला बार्ज व्यवसाय होता. शिवाय बंदर, गोदी हे मुरगाव तालुक्यात असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व दिसून येत होते. कुळे ते मुरगाव हार्बर रेल्वेचा फाटा पण होता. उत्तर भारतीय कामगारांचे अस्तित्व पण जाणवत होते. परंतु राजकीय दडपणामुळे म्हणा किंवा अल्प विकासामुळे म्हणा- कामगार संघटना बांधण्याच्या प्रक्रियेस आरंभ झाला नव्हता.

गोवा मुक्तीनंतर स्वातंत्र्यवीर स्व. विश्‍वनाथ लवंदे यांच्या नेतृत्वाखाली नदी परिवहन खात्यातील कामगारांची पहिलीवहिली कामगार संघटना जन्मास आली. कै. रमेश देसाई यांनी पण ‘हिंद मजदूर संघा’च्या झेंड्याखाली गोदी कामगारांची संघटना उभारली होती. देसाई यांनी नंतरच्या काळात आपले क्षेत्र बदलले. गोव्यातील पहिल्यावहिल्या संपाचे श्रेय आपल्याकडे जाते असे श्री. देसाई सांगत असल्याचे स्मरते. संप हा नवाच प्रकार असल्यामुळे नवनियुक्त प्रशासन हादरल्याचे पण ते सांगत. मध्यस्थीचे प्रयत्न थेट राजभवनाच्या अखत्यारीत झाल्याचे अन् आपल्याला संप प्रकरणात पोलीस कोठडीत पण रात्र काढावी लागल्याचे देसाईंनी सांगितल्याचे आठवते.
स्व. अँथनी डिसौझा यांनी पण कामगार चळवळीला गोव्यात चालना दिली. नंतरच्या काळात मजूरमंत्री म्हणून पण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु हे सारे मी मजूर खात्यात रुजू होण्याआधी. माझ्या कार्यकाळात औपचारिक तसेच व्यक्तिगत संपर्क आलेले मुख्य कामगार पुढारी म्हणजे कॉ. जॉर्ज व्हाज, ख्रिस्तोफर फोन्सेका, पुतू गावकर. मी मजूर निरीक्षक असताना मोहन नायर, शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी, गजानन पाटील, कॉ. जेराल्ड परेरा यांच्याशी संपर्क आला होता. परंतु औद्योगिक तंट्यासाठी यांचा संपर्क वरिष्ठ नेत्यांशी, अधिकार्‍यांशी येत असे.
कॉ. जॉर्ज व्हाज हे अस्नोडा हमरस्त्याच्या बाजूला एका जुन्यापुराण्या घरात राहत असत. निरागस चेहर्‍याचा हा कामगार पुढारी कलाप्रेमीही होता. कामगार चळवळीमुळे गोवा एका चित्रकाराला मुकले. वाटाघाटी, चर्चा ऐन रंगात आल्या असताना कॉ. व्हाज मिळेल त्या कागदाच्या तुकड्यावर सुंदर चित्र रेखाटत अन् ते प्रतिपक्षाच्या प्रतिनिधीच्या हातात किंवा थेट मजूर आयुक्तांच्या हातात सरकवत. कॉ. व्हाज यांच्या सरळ स्वभावाचा काही अपवादात्मक व्यवस्थापनांनी फायदा घेतला असेल; परंतु उद्योजकांच्या मनात जॉर्जबद्दल आदरभावच होता. साधी राहणी अन् धोरणात्मक दृष्टिकोनाचा अभाव असूनसुद्धा जॉर्ज वॉझ हे कामगार चळवळीत टिकून राहिले याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांचे पारदर्शी व्यक्तिमत्त्व अन् त्याकाळचे मूल्याधिष्ठित निकोप स्पर्धेवर आधारीत औद्योगिक क्षेत्र. १९८० पर्यंत गोव्यात सार्‍या क्षेत्रांत नैतिकतेचे अविरत झरे वाहताना दिसत.

त्या काळात जॉर्ज व्हाज यांच्यासारख्याची चळवळ तगली, फोफावली, कारण तिला मूल्यांचे, त्यागाचे अधिष्ठान होते. प्रायतः व्यवस्था निगरगट्ट झाली नव्हती. सौहार्दाचे, आपुलकीचे, औदार्याचे संबंध टिकून होते. सहकार्याच्या रेशमी बंधांनी विविध घटकांना एकत्रित ठेवले होते. जॉर्ज व्हाज यांच्या इराद्यांना कधीकधी राजकीय रंग दिला जात असे. सत्तरी तालुक्यातील फार्मा कंपनीच्या फार्मवर काम करणार्‍या कामगारांची संघटना ज्यावेळी जॉर्ज यांनी ख्रिस्तोफर यांच्या सहकार्याने बांधली त्यावेळी त्यांना प्रखर विरोध सहन करावा लागला. मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे जनमानसातील स्थान कमकुवत करण्याचा अंतस्थ हेतू असल्याचा कांगावा केला गेला. परंतु जॉर्ज वॉझ हे असल्या राजकारणापासून योजने दूर होते. ‘कामगार कल्याण’ हा त्यांचा एकमेव ध्यास होता. सत्तरीच्या या लढ्यामुळे गोवा बंद, आमरण उपोषण असे उपाय योजिले गेले. संप झाले. हिंसक कृत्ये घडली. जुन्ता हाउस तसेच सचिवालयास घेराव घालण्याचे प्रयत्न झाले. सिबा, टाटाच्या व्यवस्थापनांनी कठोर भूमिका घेतली. ‘आयटक’ला शेवटपर्यंत मान्यता दिली नाही. सत्तरीत, पणजीत घमासान प्रसंग घडले. सरकारने तटस्थ भूमिका स्वीकारली. मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे संयमी व्यक्तिमत्त्व पुनश्‍च एकदा अधोरेखित झाले. माननीय मुख्यमंत्र्यांनी, या संवेदनशील राजकारण्याने दाखवलेला विवेक अतुलनीय!

त्याकाळच्या औद्योगिक तंट्यांमुळे मजूर यंत्रणेला सतत सतर्क राहणे भाग पडे. रोजच आणीबाणीचा सामना करण्याची सिद्धता ठेवावी लागे. व्यक्तिगत रागलोभ, प्रतिरोधाच्या भावनेला थारा न देता रात्रीचा दिवस करून दोन्ही पक्षांना वाटाघाटीत जखडून ठेवून, घटनात्मक दृष्टिकोन बाळगून समेट करावा लागत असे. कारण गोव्यासारख्या छोट्या प्रदेशात एखादा संप किंवा टाळेबंदी जागृत प्रसारमाध्यमांचा, समाजाचा अन् राजकारणाचा विषय होत असे. कै. शिवराम आजगावकर हे म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे कामगार पुढारी होते. सहकारी क्षेत्रात पण यांच्या संघटनेची वट होती. नगरपालिका कामगारांच्या समस्या सोडवण्यात यांनी मला पूर्ण सहकार्य केले.

कै. आजगावकर आरंभीच्या काळात ‘इंटक’चे प्रतिनिधी होते. म. गो. पक्षाच्या कार्यकारिणीवर नेमणूक झाल्यावर त्यांनी ‘इंटक’ला सोडचिठ्ठी दिली. आजगावकरना कामगार चळवळीची फार मोठी पार्श्‍वभूमी होती. मुंबईच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ कामगारनेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आजगावकरांचा समेट घडवण्यासाठी द्विपक्षीय, त्रिपक्षीय चर्चेवर अवलंबून राहण्याचा दृष्टिकोन होता. परंतु प्रसंगी संपाचे हत्यार उगारायला ते मागेपुढे पाहत नसत. एका संपात सार्‍या नगरपालिका त्यांच्या विरोधात एकवटल्या. बाशिक, वाल्मिकी फालेरो, दोरादो, डिसौझा असे धुरंधर नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी आजगावकर यांचा संप हाणून पाडण्याचे प्रयत्न केले. चर्चिल आलेमांव यांची पण मदत घेतली. परंतु आजगावकर दीर्घ अनुभवामुळे या सार्‍यांना पुरून उरले. त्यांना वक्तृत्वाची देणगी होती. मार्मिक प्रहार करण्याची कला साध्य होती. प्रतिपक्षाचे मन आणि मतपरिवर्तन करण्याची खुबी सापडली होती. बेदरकारपणाला आवश्यक सावध शिकार्‍याचा संयम त्यांच्याठायी होता. कठीण प्रसंगी मनाचा तोल सांभाळण्याची अन् लक्ष्य हासील करण्याची परिणामकारक शैली होती. चर्चिल यांच्या उपस्थितीत त्यांनी बहारदार भाषण करून, कामगारांमार्फत चर्चिलना समस्या सोडवण्याचे आवाहन करून श्री. वाल्मिकी फालेरोंवर सफाईने बाजू उलटवली. त्या क्षणापासून चर्चिलना आजगावकरांची महती पटली. फालेरो यांचे चर्चिल यांची मदत घेऊन कामगार लढा उधळून लावण्याचे धोरण पूर्णपणे फसले. परंतु या संपामुळे अन् वाढत्या वयामुळे आजगावकरांची बरीच दमछाक झाली. यास्तव त्यांनी सामूहिक संपाचा पुनश्‍च कधीच विचार केला नाही. ‘फोडा अन् झोडा’ हे तत्त्वच अनुसरले. उतारवयात आजगावकर फारच मवाळ झाल्याचे दिसत होते. दृष्टी पण अधू होत चालली होती. तरी बुद्धी तल्लख होती.

कॉ. प्रभाकर घोडगे हे पण हॉटेल वर्कर्स युनियन निर्मितीत व्यस्त होते. किमान वेतन व अन्य त्रिपक्षीय परिषदांत यांचा सक्रिय सहभाग असे. बोल मुद्देसूद, परंतु आक्रमक. परंतु हिंसक कारवायांपासून अलिप्त. स्वातंत्र्यवीराची पार्श्‍वभूमी लाभलेल्या कॉ. घोडग्यांकडे आठवणींचा खजिना होता. फावल्या वेळात स्मृतीच्या या लड्या ते उलगडत. कॉ. घोडगे मूळ कोरगावचे, परंतु मडगाव शहरात स्थायिक झालेले.
कॉ. ख्रिस्तोफर फोन्सेका हे झुंजार वृत्तीचे कामगार पुढारी. आक्रमक वृत्ती; परंतु स्वभावात छक्केपंजे नाहीत. झुंजार वृत्ती अन् कामगार कल्याणासाठी अविरत धडपड करणे हा यांच्या स्वभावाचा स्थायिभाव. प्रसंगी आंदोलनाला हिंसक वळण पण लागत असे. औद्योगिक आस्थापने बंद करण्याचे पण प्रसंग येत; परंतु कॉ. फोन्सेका यांनी केव्हा आपल्या मागण्यांशी तडजोड केली नाही. कंत्राटी पद्धत नामशेष करणे अन् प्रत्येक कामगाराला महागाई भत्ता देणे या ध्येयाने फोन्सेका पछाडले होते. ज्या एम.आर.एफ. संघर्षातून ख्रिस्तोफर यांच्या आक्रमक नेतृत्वाचा जन्म झाला त्यात यांनी चर्चेद्वारा कंत्राटी कामगार पद्धती रद्द करून घेण्याची किमया साधली. ख्रिस्तोफर यांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या आत एक संवेदनशील कविमनही आहे. अतिरेकी कारवायांमुळे सहसा यांच्या व्यक्तिमत्त्वातला हा विलोभनीय आविष्कार उघड्या डोळ्यांना दिसत नाही. ही कणव, अनुकंपा फक्त कामगारांच्याच बाबतीत प्रत्ययास येत नव्हती, तर इतर प्रसंगांत पण हा गुण उजळून येत असे. कै. एस. व्ही. राव हे ‘इंटक’चे प्रतिनिधी. नंतर मला वाटते ‘हिंद मजदूर सभे’चे सभासद झालेले. विपन्नावस्थेत ख्रिस्तोफर यांनी त्यांना मानसिक व आर्थिक आधार दिला. आजारी असताना स्वखर्चाने केणी हॉटेलमध्ये त्यांना मुक्कामास ठेवले.

का कोण जाणे, या कामगार पुढार्‍याशी माझे सूर जुळले. असंख्य समेट आम्ही घडवून आणले. दहा-दहा तास मध्यरात्रीपर्यंत जागून, वाटाघाटी करून ऐतिहासिक करार घडवून आणले. ख्रिस्तोफर यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे मला अडचणीच्या प्रसंगांना पण तोंड द्यावे लागले. साम्यवादाशी आकर्षित झाल्याचे आरोप पण प्रतिस्पर्ध्यांकडून झाले.
साहित्यविषयक आवड हा एक आम्हाला जवळ आणणारा महत्त्वाचा धागा होता. शेक्सपियर, खलिल जिब्रान यांचे संवाद, काव्य ख्रिस्तोफर यांच्या ओठांवर असे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. ते सुंदर शब्दांची बोलण्यात अन् लिहिण्यात चपखल पेरणी करायचे. आक्रमक ख्रिस्तोफरपेक्षा नम्र, लाघवी ख्रिस्तोफर व्यवस्थापनाला भारी ठरायचा. परंतु या सुप्त गुणाची ख्रिस्तोफर यांना जाणीवच नव्हती. अपघाताने एखाद्या प्रसंगी ते नम्र व्हायचे अन् आपल्या शब्दलाघवाने प्रतिपक्षाला घायाळ करायचे. स्वार्थी, आपमतलबी, धूर्त चाल रचण्याची मानसिकता असती तर ख्रिस्तोफर कामगार पुढारी या दृष्टीने जास्त यश संपादन करू शकले असते. परंतु त्यांनी व्यावहारिक अन् व्यावसायिक यशापयशाची कधीच पर्वा केली नाही. बेदरकारपणे आपले अन् संघटनेचे धोरण व कार्यक्रम राबविले- वेळप्रसंगी बदलत्या काळाशी संघर्ष करून. उद्योजकांना ख्रिस्तोफर यांचा एक गुण आवडायचा, तो म्हणजे संघटनेवरची पकड. यामुळे समेटाची अंमलबजावणी शंभर टक्के असणार अन् कामगार पूर्ण क्षमतेने उत्पादन देणार याची व्यवस्थापनाला खात्री असायची. यामुळेच आरंभी या संघटनेला मान्यता न देणारी आस्थापने स्वखुशीने ख्रिस्तोफर यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यासाठी तत्परता दाखवू लागली. अनुभवांती आलेली परिपक्वता ख्रिस्तोफर यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक आगळा आयाम देऊन गेली. हे बळकट अन् प्रत्ययकारी प्रतिनिधित्व दोन्ही पक्षांना उपकारक ठरले.

जागतिकीकरणामुळे आलेल्या बदलांमुळे कामगार संघटनांना दुर्बलतेचा सामना करावा लागला. ख्रिस्तोफर यांनी पण हा अटळ बदल पाहिला, अभ्यासला अन् पर्यायाने शैलीत फेरफार केले, पण मूलगामी धोरणाला धक्का न लावला. कामगारांच्या आकांक्षा, निष्ठा, अपेक्षा पण काळाप्रमाणे बदलत राहिल्या. सांघिक कल्याण व लढा यांची जागा स्वकेंद्रित कल्याणात परिवर्तित झाली. समाज बदलला, अर्थव्यवस्था बदलली, तसेच कामगारांचे आचारविचारही बदलले. ‘आयटक’चे धोरण कामगारांच्या दीर्घ लढ्यावर आधारित होते. राज्यव्यवस्थेत मूलभूत बदल आणून कामगारांचे हक्क अबाधित राखण्यावर भर दिला गेला. परंतु झटपट युगात ही ध्येयधोरणे स्वीकारण्याची कामगारांची मानसिकता लुप्त झाली होती. कामगार पण व्यवस्थेचा भाग होत असल्याचे संकेत मिळत होते. ख्रिस्तोफर यांच्या हा बदल जिव्हारी लागला. परंतु ते वेळीच सावरले अन् नव्या पद्धतीशी जुळवून घेण्याच्या पर्यायात गुंतले. पण दुर्दैवाने ख्रिस्तोफर आपला खराखुरा वारसदार निर्माण करू शकले नाहीत, हीच गोव्यातील कामगार चळवळीची शोकांतिका म्हणावी लागेल.

अलीकडच्या काळातला आणखी एक आघाडीचा कामगार पुढारी म्हणजे पुतू गावकर. गोवा शिपयार्ड लि. या वास्को येथील सुप्रसिद्ध निमसरकारी संरक्षणविषयक सामग्री निर्माण करणार्‍या आस्थापनात काम करणारा हा एक कुशल कामगार. नंतर कामगार पुढारी, प्रागतिक शेतकरी अन् अलीकडे खनिजबंदी विरोधातला खंदा आंदोलक अशी चढती कमान चढता झाला. हा एक कष्ट अन् लवचीक मानसिकतेचा आविष्कारच म्हणावा लागेल. गोवा शिपयार्डमध्ये असताना यांना दिवंगत कामगार पुढारी बाबुराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ कामगारनेते एस. आर. कुलकर्णी यांनी गोव्यात, प्रायतः गोवा शिपयार्डमध्ये ‘हिंद मजदूर सभे’ची संघटना निर्माण केल्यावर श्री. पुतू गावकर यांची कै. कुलकर्णींशी जवळीक निर्माण झाली. आंतर कामगार संघटनेच्या संघर्षाचे गोवा शिपयार्ड हे दोन दशके केंद्रच झाल्याचे प्रतीत होत होते. याच दरम्यान श्री. व्हिन्सी डायस यांचे आक्रमक नेतृत्व आकारास येत होते. श्री. पुतू गावकर यांचे डोळे मात्र वेगळ्याच भविष्याचे वेध घेत होते. राष्ट्रीय सेवक संघाच्या अन् पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर राष्ट्रीय तसेच स्थानिक नेत्यांशी श्री. गावकर यांचे निकटचे संबंध होते. दरम्यान, गोवा शिपयार्डातून श्री. गावकर सेवामुक्त झाले. सारेच आडाखे अन् योग जुळून येत होते. श्री. गावकर यांनी दमदारपणे गोव्यातील भारतीय मजदूर संघ या भाजपाप्रणीत कामगार संघटनेची धुरा खांद्यावर घेतली. गोव्यातील भाजपची कमान उंचावत होती अन् वाटचाल सत्तास्थापनेच्या दिशेने वेगाने होत चालली होती. कै. मनोहर पर्रीकर, श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, कुशल संघटक सतीश धोंड, नरेंद्र सावईकर, राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक या ध्येयवादी, उत्साहाने सळसळणार्‍या नेत्यांची, कार्यकर्त्यांची फळी भक्कमपणे भाजपाचा राजकीय पाया बसवण्याचे अविरत प्रयत्न करत होती. प्रा. सुभाष वेलिंगकर हा गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवकांचा खंदा आधारस्तंभ भाजपाचे ईप्सित साध्य होण्यासाठी रात्रंदिवस सुप्त ऊर्जा पुरवत होता. अशा स्थित्यंतराच्या काळी भाजपाला कामगार विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्री. गावकरांचे सहकार्य होणे साहजिकच होते.

भाजपची, राष्ट्रीय सेवक संघाची अन् भारतीय मजदूर संघाची घोडदौड तुफान वेगाने चालली होती. श्री. गावकर यांनी यशस्वीपणे साम्यवादी अन् समाजवादी कामगार चळवळीला रोखण्याचे प्रयत्न सफल झाल्याचे संकेत मिळत होते. परंतु या दृष्ट लागण्यासारख्या सामूहिक वाटचालीला गालबोट लागले. श्री. गावकर व भाजपा यातील सुप्त संघर्ष कालपरत्वे उफाळून आला. याची कारणे विविध असू शकतील. कदाचित श्री. गावकर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा असेल किंवा व्यक्तिगत संबंधांना लागलेली ठेच असेल. श्री. गावकर अन् भाजपातील नेते यांतील दरी रुंदावत होती. पर्यायाने याची परिणती श्री. गावकर यांच्या भारतीय कामगार सेनेच्या सोडचिठ्ठीत होणे अपरिहार्य होते अन् ते तसे झालेच. श्री. गावकर यांचे भारतीय मजदूर संघातले गमन या संघटनेच्या गोव्यातील पतनाचा आरंभ ठरला. श्री. गावकर यांच्यानंतर आलेले नेतृत्व चमक दाखवू शकले नाही अन् या संघटनेचे अस्तित्व गोव्यात नाममात्र राहिले.
काही का असेना श्री. गावकरांची भारतीय मजदूर संघातील अनुपस्थिती संघटनेला बाधक ठरली यात संदेह नाही. भारतीय मजदूर संघाशी काडीमोड घेतल्यावर श्री. गावकर यांनी आपली संघटना उभारली. परंतु तोपर्यंत जागतिकीकरणाचे पडसाद गोव्याच्या औद्योगिक संबंधात उमटण्याचे संकेत मिळत होते. कामगार चळवळच आपली ताकद अन् स्वत्व हरवत चालल्याचे दिसत होते. श्री. गावकर यांनी आपल्या उपजत समयसूचक स्वभावामुळे खाण अवलंबितांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित केले. परंतु तोपर्यंत श्री. गावकर यांचे कामगार पुढारी म्हणून असलेले वलय लुप्त होत चालल्याचे स्पष्टपणे दिसत होते. खाण अवलंबितांचा प्रश्‍न न्यायप्रक्रियेत अडल्यामुळे श्री. गावकर संबंधित घटकांना न्याय देऊ शकले नाहीत. या आंदोलनामुळे गावकर यांना प्रसिद्धी मिळाली, परंतु प्रतिमेला तडे गेले. धूर्त चाली खेळून हमखास यश मिळवणार्‍या गावकर यांची शैली या आंदोलनात फिकी पडल्याचे प्रतीत होत होते. गावकर यांच्या कार्यशैलीत गोव्यातील कामगारांच्या कल्याणासाठी नवे पर्व निर्माण करण्याची क्षमता होती. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. भारतीय मजदूर संघातून बाहेर पडल्यावर दोन्ही संघटना अन् गावकर निस्तेज झाले. साम्यवादी कामगार चळवळीला संघटनात्मकदृष्ट्या प्रतिस्पर्धी निर्माण करण्याची सुवर्णसंधी दवडली गेली. गोव्यातील (संघटित व असंघटित) कामगार क्षेत्रात याचे दूरगामी परिणाम झाले. ख्रिस्तोफर अन् गावकर ही दोन विभिन्न व्यक्तिमत्त्वे, विभिन्न आदर्श, विभिन्न नेतृत्व, विभिन्न संघटनकौशल्य, विभिन्न आंदोलनशैली, विभिन्न वाटाघाटींच्या शैली, विभिन्न योजिलेल्या चाली अन् खेळ्या… परंतु औद्योगिक तंट्यांना, चर्चेला आपल्याला हवे तसे वळण देण्यात दोघेही वाकबगार!
कामगार चळवळ हा अव्याहत वाहणारा प्रवाह. काळाच्या प्रवाहात कितीतरी कामगारनेत्यांचा अस्त होतो. लगेच पोकळी भरून येते. निसर्गाचा हा नियमच आहे. परंतु आता नवीन पिढीत कामगार चळवळीत आपले जीवन झोकून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही.

‘सिटू’च्या दुसर्‍या फळीतील कामगारनेते म्हणजे कै. गोपीनाथ मांद्रेकर, आनंद बेतकीकर, एस. एस. नाईक, नीळकंठ यांच्याशी पण माझे चांगले संबंध जुळून आले होते. आनंदला इंग्रजीचा गंध नसून पण कधी न्यूनगंड आला नाही. वाटाघाटीत त्याच्या नेतृत्वगुणांचा प्रभाव दिसून येत असे. मार्मिक बोलून प्रतिपक्षाला गोंधळात टाकण्याचे कसब यांना साध्य होते. कुणाच्या व्यक्तिगत भानगडी पण चव्हाट्यावर आणायला ते मागेपुढे पाहत नसत. यामुळे सारेच यांना बिचकून असत. जिभेवर पूर्ण नियंत्रण असूनसुद्धा लगाम नसल्यासारखे बोलून प्रतिपक्षाला घायाळ करणे यांना चांगलेच जमत असे. इतके करूनही व्यवस्थापनाच्या उच्च अधिकार्‍यांशी यांचे संबंध सलगीचे. एस. एस. नाईक हे मितभाषी. परंतु कायद्याचा कीस काढणारे. यांच्या शंका-कुशंकांचे निरसन करणे म्हणजे महत्प्रयास. औद्योगिक तंट्याचे जहाज यांना वळसा घालून समेटाच्या लक्ष्यापर्यंत नेईपर्यंत माझी दमछाक होत असे. प्रामाणिकपणा असून लवचीक दृष्टिकोन नसल्यामुळे हा नेता म्हणावी तशी उंची गाठू शकला नाही. कॉ. गोपीनाथ मांद्रेकर म्हणजे झुळझुळत्या लाघवाचा झरा. साम्यवादी प्रणाली मानणारा हा कामगारनेता वेळप्रसंगी गावातल्या उत्सवांत पगडी डोक्यावर ठेवून हरदासाची पण भूमिका तेवढ्याच भक्तिभावाने वठवत असे. स्वर्गवासी जेराल्ड परेराच्या आकस्मिक निधनानंतर ‘सिटू’ या संघटनेची धुरा त्यांच्या पत्नी डॉ. लुईझा परेरा यांनी सांभाळली. आपला व्यवसाय सांभाळून संघटनेला ऊर्जितावस्थेला आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. थोडीफार त्यांना सुपुत्राची साथ लाभली. परंतु स्व. जेराल्डच्या जहाल नेतृत्वाचा अभाव अन् विजिगीषू वृत्तीची उणीव यामुळे या संघटनेचा हळूहळू अस्त आला, ज्याची नोंदच घेतली गेली नाही.

‘सिटू’ची ही पोकळी उजव्या साम्यवादी विचारप्रणालीच्या ‘आयटक’ या कामगार संघटनेने भरून काढली. एक वर्तुळ पूर्ण झाले. गोव्यात अंतर्गत कामगार संघटना रुजल्या नाहीत. नेतृत्वाचा अभाव, मर्यादित निर्णयक्षमता, निःस्पृह वृत्तीची कमतरता, अपरिपक्व वृत्ती, सदस्यांवर वचक नसणे, कठीण प्रसंगी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहणे, बेदरकार वागणे, नियंत्रण ठेवण्यातील असफलता अन् अंतर्गत बेबनाव यामुळे सरकारचा पाठिंबा असून पण अशा संघटनांचे अस्तित्व अळंब्यासारखे राहिले. जुवारी ऍग्रो केमिकल्स, गोवा शिपयार्ड, मांडवी शिपयार्ड, सेझा गोवा या आस्थापनांत अंतर्गत कामगार संघटना कार्यरत होत्या. परंतु अनाकलनीय मतभेदांमुळे या संघटनेत दुफळी माजून एकात्मतेला तडे गेले.

कॉ. सुभाष नाईक जॉर्ज या बँक कर्मचार्‍यांच्या नेत्याने पण आपल्या संयत आंदोलन शैलीमुळे गोव्याच्या कामगार चळवळीत आपली नाममुद्रा उमटवली आहे. शिवाय श्रमिक पत्रकारांना पण त्यांचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करताना ते दिसत आहेत.

आता असंघटित कामगारांना अंतर्गत संघटना हा एकच पर्याय राहिलेला आहे. कारण जागतिकीकरणाच्या रेट्यात बाहेरील नेतृत्व प्रभावहीन ठरत असल्याचे दृष्टीस पडते आहे. कंत्राटीकरण, फ्रेंचायजी, आउट सोर्सिंग यामुळे संघटना बांधण्याची प्रक्रिया किचकट अन् पर्यायाने क्षीण झालेली आहे. व्यवस्थापन पुरस्कृत संघटना किंवा समित्यांमार्फत वाटाघाटी होऊन समेट होण्याचा काळ अस्तित्वात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वसमावेशी विमा योजनांमुळेच कामगारांचे कल्याण होऊ शकते. त्यातून रोजगार बंद झाल्यावर आर्थिक स्रोत चालू राहण्याची व्यवस्था होईल. भरवशाच्या विमा योजना अन् विमा कंपन्या अन् दूरगामी धोरण आखणार्‍या आस्थापनांनी यावर योग्य तोडगा काढणे आवश्यक आहे. किंबहुना समाजस्वास्थ्याच्या अन् आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हे अनिवार्य आहे.

श्री. अजितसिंह राणे यांनी पण काही काळ गेल्या दशकात गाजवला. पण विद्यार्थी चळवळीची पार्श्‍वभूमी असलेला हा कामगार नेता आपला असा ठसा उमटवू शकला नाही. आक्रमक वक्तृत्वाची देणगी अन् कामगार आकर्षित करण्याची आगळी शैली असूनसुद्धा अजितसिंह आपल्या मर्यादांच्या चौकटीतच अडकून पडले. अवाजवी मागण्यांमुळे वाटाघाटीच्या टेबलावर अजितसिंह सफल होऊ शकले नाहीत. प्रायतः कामगार चळवळीचे प्रशिक्षणच यांना न मिळाल्यामुळे विद्याविभूषित असूनसुद्धा त्यांना कित्येक औद्योगिक तंट्यांत समेट घडवून आणण्यात संपूर्ण अपयश आले.

कामगार चळवळीतील बारकावे अनुभवाच्या अभावामुळे त्यांना ओळखताच आले नाहीत. वाटाघाटी अन् औद्योगिक लवादासमोर बाजू मांडणे हा त्यांचा कच्चा दुवा. यामुळे त्यांच्या नेतृत्वातील अन् व्यक्तिमत्त्वातील त्रुटी अधोरेखित झाल्या. सुप्त राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे पण ते कामगार चळवळीशी मनाने कधी जोडलेच गेले नाहीत.
कोणत्याही कामगार नेत्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे परवडणारे नाही. अजून श्री. अजितसिंहांकडे उज्ज्वल भविष्य आहे, ऊर्जा आहे. दृष्टिकोन बदलून लवचीक धोरण स्वीकारून औद्योगिक संबंधातील मर्म जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर अजितसिंह अजून प्रभाव पाडू शकतात. आक्रमकता अन् लाघव, लीनता अन् व्यावहारिकता, ऊर्जा अन् संयम, सुसंवाद, झुंजार अन् संयमी वृत्ती आणि समयसूचकता यांचे आकलन झाले तर गोव्यात आलेली कामगार चळवळीतील पोकळी अजितसिंह भरून काढू शकतात. बघू, अजितसिंह हे आव्हान कितपत पेलू शकतात? कारण गोव्याच्या औद्योगिक क्षेत्रात आलेल्या बदलाचे विश्‍लेषण करणे दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. ऍड. आनंद कुंडईकर पण आपल्या परीने कामगारांच्या समस्या हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. कदंबा कामगारांचे प्रतिनिधित्व करताना ते दिसत आहेत. ज्येष्ठ सल्लागार किशोर नाडकर्णी पण अव्याहतपणे कामगारांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. परंतु यांच्या चळवळीचा बाज वेगळा, आंदोलनापेक्षा कायदेशीर इलाजावर विश्‍वास. दीर्घ अनुभवामुळे औद्योगिक लवादासमोरच्या कज्ज्यांत यांना यश मिळण्याची शक्यता दिसते. श्री. हृदयनाथ शिरोडकर आपल्या परीने कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु प्राप्त परिस्थितीत गोव्यातील कामगार चळवळीला मरगळ आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या चळवळीत नावीन्याची, नवनिर्माणाची आत्यंतिक गरज आहे. परंतु या चळवळीतील प्रवर्तकांनी औद्योगिक स्थितीचे भान ठेवणे अत्यावश्यक. कारण उद्योगाच्या अस्तित्वावरच कामगारांचे अन् कुटुंबीयांचे अस्तित्व अवलंबून असते. आर्थिक संदर्भ, राजकीय रंग, मागणी पुरवठ्यातील अनिश्‍चितता, गतिमान तंत्रज्ञान, उद्योजकांची तशीच कामगारांची अचूक मानसिकता, बाह्य घटकांचा प्रभाव, अर्थसाहाय्याचे स्रोत यांचा वेध घेऊन आनुषंगिक बदल धोरणात अन् संघटन शैलीत करणारी, आदर्शवाद अन् अस्तित्ववाद यांचा बेमालूम संयोग असलेल्या सक्षम कामगार चळवळीची गरज आहे. परंतु परिस्थितीचे आकलन केल्यास हे दिवास्वप्न ठरेल असेच संकेत मिळताहेत. भारतातील अन् गोव्यातील कामगार चळवळीच्या परंपरेचा परिचय करून देणेच नव्या पिढीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.