जीएसआयडीसीच्या प्रकल्पांना गती देणार

0
13

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची महामंडळाच्या बैठकीनंतर माहिती

गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे ज्या विकास प्रकल्पांचे काम चालू आहे, त्या विकास प्रकल्पांच्या कामाचा फेरआढावा घेण्यात येणार असून, या प्रकल्पांच्या कामाला गती देऊन ते शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती काल गोवा साधनसुविधा विकास महामंडळा (जीएसआयडीसी)चे चेअरमन तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

काल जीएसआयडीसीच्या महामंडळाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पूर्वी ज्या प्रकल्पांचे काम हाती घेतले होते, त्याच प्रकल्पांचे काम चालू असून, कुठलेही नवे मोठे प्रकल्प उभारण्याचे काम जीएसआयडीसीने हाती घेतले नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

सध्या ज्या प्रकल्पांचे काम चालू आहे, त्यापैकी पूल, विद्यालयांच्या इमारती, इस्पितळ व आरोग्य खात्याच्या इमारती या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जोशुआ डिसोझा नाराज नाहीत
म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज आहेत आणि म्हणूनच त्यांनी जीएसआयडीसीच्या उपाध्यक्ष पदाचा अद्याप ताबा घेतलेला नाही, अशी चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा त्यांनी केला.