कडाडलेल्या इंधन दरांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना कधी नव्हे ती भारतामध्ये पसंती वाढत असतानाच गेल्या महिन्याभरात अशा इव्हींच्या बॅटर्या फुटून आग लागण्याच्या किमान सात घटना देशभरात घडल्या. मागील महिन्याच्या अखेरीस २६ मार्चला एका ओला इव्हीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर वेल्लोरमध्ये ओकिनावाच्या इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ अशा दुर्घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. ३० मार्चला प्युअर इव्ही दुचाकीला आग लागली, ११ एप्रिलला नाशिकमध्ये जितेंद्र इव्ही घेऊन चाललेल्या एका ट्रकलाच लागली. गेल्या १८ एप्रिलला तामीळनाडूत ओकिनावाच्या इव्हीला आग लागली, पाठोपाठ प्युअर इव्हीच्या दुर्घटनेत एका ऐंशी वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागला. परवाच सातव्या घटनेत एका इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी घरात चार्ज करीत असताना एका चाळीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंब मृत्यूशी झुंज घेत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील या दुर्घटनांनंतर अशा वाहनांचे खंदे पुरस्कर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपन्यांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे. खरे तर जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना सध्या उदंड लोकप्रियता लाभत असताना आणि टेस्लापासून बीएमडब्ल्यूपर्यंतच्या बड्या वाहन उत्पादकांनी आपली चारचाकी आलिशान वाहनेही इलेक्ट्रिक बनवलेली असताना अशा दुर्घटना तेथे क्वचितच घडल्या आहेत. मग भारतामध्येच असे इलेक्ट्रिक वाहनांचे स्फोट का होत आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. इव्हीच्या बॅटरीला आग का लागते? या वाहनांमध्ये आपल्या फोन किंवा लॅपटॉपप्रमाणेच लिथियम आयनच्या बॅटर्या वापरल्या जात असतात. ऍनोड म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोडमधून कॅथोड म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडमध्ये इलेक्ट्रोलाइटस्च्या माध्यमातून जेव्हा विद्युतप्रवाह खेळवला जातो व इलेक्ट्रॉन जातात तेव्हा लिथियम – आयन चार्ज होत असतात. बॅटरी चार्ज होताना एक विशिष्ट तापमान गाठले गेले की ही प्रक्रिया आपोआप बंद होण्याची गरज असते, अन्यथा शंभरच्या वर तापमान गेले की थर्मल रनअवे म्हणजेच विद्युतप्रवाह अनियंत्रित होऊन आग लागते. बॅटर्या हे तापमान गाठू नये यासाठी वास्तविक अशा वाहनांमध्ये स्मार्ट बॅटरी व्यवस्थापन किंवा थर्मल व्यवस्थापन यंत्रणा असणे गरजेचे असते. शिवाय बॅटर्या गरम होऊ नयेत यासाठी ऍक्टिव्ह कूलिंग सिस्टमही असेल तर ते सर्वथा सुरक्षित असते. मात्र, बहुतेक दुचाक्या व इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्ह कूलिंग सिस्टमऐवजी पॅसिव्ह म्हणजे केवळ बॅटरीशेजारून वारा खेळेल याची व्यवस्था करून ती थंड ठेवण्याचा प्रयत्न होतो. परंतु आपल्याकडे सध्या कडक उन्हाळा असल्याने हे तापमान आधीच वाढलेले असते. याशिवाय निकृष्ट प्रकारच्या बॅटरी सेल किंवा बॅटरी पॅक असेम्ब्लीमुळेही तापमान वाढताच बॅटरी वितळून आग लागते. आपल्या उत्पादनाची किंमत कमी करण्याच्या नादात या इलेक्ट्रिक वाहन कंपन्या, विशेषतः दुचाकी कंपन्या बॅटर्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत असाव्यात असे दिसते. सरकारने याची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समितीची घोषणा केली आहे, त्यातून यासंदर्भातील सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. या दुर्घटना प्राणघातक ठरलेल्या असल्याने तेवढ्याच गांभीर्याने त्यांसंदर्भात चौकशी झाली पाहिजे. टेस्लासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिक्विड कूलिंग सिस्टम असते. दुचाक्यांमध्ये अशा महागड्या तंत्रज्ञानाची जरी अपेक्षा ठेवता येत नसली तरी किमान उत्तम बॅटरी व्यवस्थापन यंत्रणा, उत्तम गुणवत्तेच्या बॅटरी सेल हे दंडक तरी पाळले गेलेच पाहिजेत.
गेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बॅटरीविषयक धोरण जाहीर करण्याची घोषणा केलेली होती, त्यानुसार नीती आयोगाने कामही सुरू केलेले आहे. हे धोरण अमलात येताच बॅटरी घरी चार्ज करण्याची गरज भासणार नाही. ठिकठिकाणी त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था होईल. परंतु तरी देखील मुळात इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटर्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारने इलेक्ट्रिक वाहने, विशेषतः दुचाक्या उत्पादित करणार्या कंपन्यांना कठोर सुरक्षात्मक दंडक घालणे गरजेचे आहे. दुर्घटनांनंतर संबंधित बॅचच्या दुचाक्या या उत्पादकांनी बाजारातून मागे घेतल्या आहेत, परंतु हे पुरेसे नाही. सरकार इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांवर सवलतींचा वर्षाव करते आहे. स्पर्धेमुळे किंमती कमी ठेवण्याचा प्रयत्न उत्पादकांकडून चालतो, परंतु वाहनांतील बॅटर्यांच्या गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड होता कामा नये. तसा तो होणार नाही आणि कोणाच्या जिवावर बेतणार नाही हे सरकारने पाहिलेच पाहिजे. अन्यथा इंधनाच्या चढ्या दरांमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणारा ग्राहक आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे ठरेल व प्रसंगी त्याला जीवही गमवावा लागेल.