दक्ष न राहिल्यास लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळेल

0
52

>> शरद पवार; लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

राज्यकर्त्यांनी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्यांचा शिरकाव झाला आहे. हाच कॉर्पोरेटीकरणाचा प्रयोग आता साहित्यात होत आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. देशात विशिष्ट विचारधारेचा प्रचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे असेच सुरू राहिले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागेल, असे उद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला काल सुरुवात झाली, त्यावेही उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. उदगीर नगरीतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावर शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

यावेळी पवारांनी राजकारणी आणि साहित्यिक यांचे नाते कसे असावे, हे सांगताना साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये, असे आवाहन केले. साहित्य-राजकारण यांचा तसा अतूट संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यव्यवस्था स्थापित झाल्यावर प्रसारमाध्यमे अथवा साहित्य हा लोकशाहीचा चौथा स्तंभ गणला गेला. हा चौथा स्तंभ जिवंत राहावयास हवा, असे पवार म्हणाले.

मराठी साहित्य संमेलन
पान २ : चतुर मौन सोडून लेखकाने बोललेच पाहिजे
पान ७ : गोव्यात मराठीलाही राजभाषा करण्यास कोकणीप्रेमींनी पुढे यावेे