राज्यातील जनता उकाड्याने हैराण

0
27

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून, वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पणजीमध्ये ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, सामान्य तापमानापेक्षा २.९ अंश सेल्सिअस जास्त आहे.

राज्यात गुरुवारपासून उकाडा प्रचंड वाढला आहे. परिणामी केवळ दिवसाच नव्हे, तर रात्री देखील अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. सकाळी ११ नंतर सूर्य अधिकच आग ओकत असल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे.

राज्यात २१ एप्रिल रोजी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर २२ रोजी तापमानात घट झाली असून ३४.४ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. राज्यातील काही भागात येत्या २४ एप्रिलपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

येथील हवामान विभागाने राज्यातील तापमानात शनिवारपासून १ ते २ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात चालू आठवड्यात सामान्य तापमानापेक्षा १.५ ते २.९ अंश सेल्सिअस एवढी वाढ झालेली दिसून येत आहे.
दरम्यान, यापूर्वी पणजीमध्ये ७ एप्रिल १९८९ मध्ये ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.