जिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालय येणार सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत

0
20

>> सहा महिन्यात यंत्रणा बसवणार : मोन्सेरात

राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयातील कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून ते महसूल मंत्री कार्यालयाला आणि महसूल सचिव कार्यालयाला जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. याविषयी माहिती-तंत्रज्ञान मंत्र्यांशी चर्चा करून येत्या सहा महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

मामलेदार कार्यालयातील कारभारात पक्षपातीपणा होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. मामलेदार कार्यालयात न्यायदानाच्या बाबती पक्षपातीपणा होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. महसूल खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून योग्य सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच हे प्रकार रोखण्यासाठी येत्या सहा महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

राज्यातील मामलेदार कार्यालयात प्रलंबित असलेली कूळ-मुंडकार प्रकरणे येत्या सहा महिन्यांत निकालात काढण्याची सूचना करण्यात आली आहे. मामलेदार कार्यालयाच्या कारभारात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. येत्या १ जूनपासून लोकांना दिलेल्या आश्वासनाचे पालन करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी आल्वारा जमिनींच्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहे. आल्वारा जमीनधारकांवर अन्याय होता कामा नये. त्यांच्याही मागण्यांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्तीची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.