खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू

0
12

>> उद्योगांवरील वीज वापराबाबतचे निर्बंध मागे

राज्य सरकारने खुल्या बाजारातून १२० मॅगावॅट वीज खरेदीला सुरुवात केली असून, राज्यातील उद्योगांवर वीज वापराबाबत लादण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, गोवा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी वीजटंचाईची समस्या दूर केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची आभार मानले आहेत.

राज्यात विजेची टंचाई निर्माण झाल्याने उद्योगांवर वीज वापराबाबत निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर गोवा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष कोचकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वीजटंचाईची समस्या मांडली होती. तसेच राज्यातील उद्योगांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त वीज खरेदीची मागणी त्यांनी केली होती.

वीजमंत्री ढवळीकर यांनी खुल्या बाजारातून वीज खरेदीचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे पाठविला होता. मुख्यमंत्र्यांनी वीज खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी तातडीने हालचाली करण्यात आल्या.