आयुष इस्पितळ जूनपासून कार्यरत ः मुख्यमंत्री

0
24

>> पेडणे नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन; आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचीही घोषणा

पेडणे तालुक्यातील धारगळ येथील आयुष इस्पितळ येत्या जून महिन्यापासून कार्यरत होणार आहे. तसेच पेडणे तालुक्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण १५ ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. याशिवाय तालुक्यात आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेडणे येथे पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन काल झाले. त्यानंतर ते बोलत होते. या इमारतीवर एकूण ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, त्या कामाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडण्याच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर आदी उपस्थित होत्या.

जून महिन्यात आयुष इस्पितळ रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याचबरोबर १५ ऑगस्टला मोपा विमानतळावरून पहिले विमान उड्डाणाचे ध्येय ठेवले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पेडण्यात मासळी मार्केट साकारले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बाबू आजगावकरांचा विसर
तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी प्रशासकीय इमारत होण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले होते. विधानसभा निवडणूक आणि आचारसंहिता लागल्यामुळे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भूमिपूजनासाठी वेळ न मिळाल्याने या इमारतीचे भूमिपूजन आजगावकर यांच्या कारकिर्दीत झाले नाही. हा प्रकल्प आजगावकर यांच्या प्रयत्नाने होत आहे; मात्र आजच्या दिनी त्यांची कुणीच आठवण काढली नाही.

खुल्या बाजारातून वीज खरेदीला मंजुरी
उद्योगांची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून १२० मेगावॅट वीज खरेदी करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंजुरी दिली आहे. उद्योग संघटनांनी वीज मंत्र्यांकडे आपली मागणी मांडली असून, त्यांच्या मागण्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

येत्या दोन दिवसांत उद्योग संघटनांची मागणी पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून १२० मेगावॅटची वीज खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंगळवारी पेडणे येथील येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले. तीव्र वीजटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर उद्योग संघटनांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची मागणी केली होती.