>> उपनगराध्यक्षपदी अर्चना नाईक डांगी
गेल्या वेळी हुलकावणी दिलेल्या नगराध्यक्षपदाची माळ काल अखेर रितेश नाईक यांच्या गळ्यात पडली. अर्चना नाईक डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या दोन्ही रिक्त जागांसाठी काल निवडणूक झाली.
नगराध्यक्षपदासाठी रितेश नाईक, तर उपनगराध्यक्षपदासाठी अर्चना नाईक डांगी यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने दोघांनाही बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. या बैठकीला सर्व नगसेवक उपस्थित होते.
मगो समर्थक नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव ८ विरुद्ध ० मतांनी संमत झाल्यामुळे दोन्ही पदे रिक्त झाली होती. वेगवान राजकीय घडामोडींत भाजपविरोधी नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक आणि चंद्रकला नाईक यांनी आता भाजप समर्थक रितेश नाईक व अर्चना नाईक डांगी यांना समर्थन दिल्याने फोंडा पालिकेवर आता भाजपराज आले आहे. निवडणुकीचे कामकाज सरकारी अधिकारी नीलेश धायगोडकर व योगीराज गोसावी यांनी पाहिले.
दरम्यान, कृषिमंत्री रवी नाईक यांनी फोंडा पालिकेला भेट देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचे अभिनंदन केले.
रवींनी दाखवली ताकद
गतवर्षी आमदार रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली होती, पण भाजपमध्येच विरोध झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. रितेश नाईक यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांना नगराध्यक्ष पदाची ऑफरही देण्यात आली होती; पण ऐनवेळी भाजपमधील बंडाळीमुळे ते शक्य झाले नव्हते. आता अखेर रितेश नाईक अखेर नगराध्यक्ष बनलेच अन् रवींनीही आपली ‘ताकद’ दाखवून दिली.
फोंडा पालिकेचे सर्व नगरसेवक एकसंध आहेत. सर्व प्रभागात विकासकामे करण्यात येतील. कोणताही भेदभाव केला जाणार नाही. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फोंड्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील. त्यात मार्केट संकुल तसेच गोल्डन ज्युबिली प्रकल्पासह अन्य विकासकामांचा समावेश असेल.
- रितेश नाईक, नगराध्यक्ष, फोंडा नगरपालिका.