वीज खाते अखेर सुदिन ढवळीकरांकडेच

0
18

>> भाजप मंत्र्यांच्या विरोधानंतरही वीजे खाते बहाल
>> उर्वरित खात्यांसह महामंडळांचे वाटप देखील जाहीर
>> हळर्णकरांकडे मत्स्योद्योग, फळदेसाईंकडे समाज कल्याण
>> १० आमदारांना महामंडळे, तर दोघांना पीडीएचे अध्यक्षपद

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्या तिघा आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली होती, त्या मंत्र्यांना काल खात्यांचे वाटप करण्यात आले. या खातेवाटपात सुदिन ढवळीकर यांना महत्त्वाचे असे वीज खाते मिळाले आहे. भाजप मंत्र्यांच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांनी ढवळीकरांकडे वीज खाते दिले आहे. तसेच त्यांच्याकडे अन्य दोन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या खातेवाटपानंतर काही वेळातच १० आमदारांना महामंडळांचे वाटप करण्यात आले, तर दोन आमदारांना उत्तर व दक्षिण गोवा पीडीएचे अध्यक्षपद देण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळातील तिघाही नव्या मंत्र्यांचे खातेवाटप काल झाले. अपेक्षेप्रमाणे मगो पक्षाचे दिग्गज नेते सुदिन ढवळीकर यांना महत्त्वाचे वीज खाते देण्यात आले असून, त्यांना गृहनिर्माण आणि नवीन व अक्षय ऊर्जा हे खातेही देण्यात आले आहे. नीळकंठ हळर्णकर यांना मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि कारखाने व बाष्पक ही खाती देण्यात आली आहेत. मंत्री सुभाष फळदेसाई यांना समाज कल्याण, नदी परिवहन आणि पुराभिलेख व पुरातत्त्व ही खाती देण्यात आली आहेत.

मंत्रिमंडळातील एकमेव बिगरभाजप नेते असलेले मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांना वीज खाते देऊ नये, यासाठी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता. त्यामुळेच नव्या तीन मंत्र्यांचे खातेवाटप काही दिवस लांबले होते; मात्र केंद्रातील नेत्यांनी सुदिन ढवळीकर यांनाच वीज खाते देण्यात यावे, असा आदेश दिल्यामुळे या मंत्र्यांचा विरोध असतानाही मुख्यमंत्र्यांनी वीज खाते ढवळीकर यांना दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गृह, अर्थ, कार्मिक, दक्षता, राजभाषा आदी महत्त्वाची खाती असून, खाण हे महत्त्वाचे खातेही मुख्यमंत्र्यांनी आपणाकडे ठेवलेले आहेत. शिक्षण खातेही मुख्यमंत्र्यांनी कुणाला दिलेले नसून, ते खातेही त्यांच्याकडे राहणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलेल्या तिन्ही मंत्र्यांना काल खाती दिल्याने आता खातेवाटप पूर्ण झालेले असून, जी खाती कुणालाही देण्यात आलेली नाहीत, ती खाती मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहेत.

काहींना महामंडळे, काहींना पीडीए

या खातेवाटपानंतर काल सायंकाळीच मंत्रिपद न मिळालेल्या १० आमदारांना महामंडळांचे वाटप करण्यात आले. भाजपला पाठिंबा दिलेल्या तीन अपक्ष आमदारांसह मगोचे आमदार जीत आरोलकर यांनाही महामंडळ देण्यात आले आहे. तसेच भाजपच्या ६ आमदारांना महामंडळे देण्यात आली आहेत. गणेश गावकर व आलेक्स रेजिनाल्ड यांना महत्त्वाची महामंडळे मिळाली असून, त्यांच्याकडे अनुक्रमे पर्यटन विकास महामंडळ व औद्योगिक विकास महामंडळाची धुरा सोपवली आहे. जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे एनजीपीडीएचे अध्यक्षपद, तर दाजी साळकर यांच्याकडे एसजीपीडीएचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.