कल्याणकारी योजना सुरुच राहणार

0
31

>> मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; योजना बंद करण्याचा विचार नाही

दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृहआधार या योजनांसह सर्व कल्याणकारी योजना चालू असून, सरकारने कोणत्याही कल्याणकारी योजना बंद केल्या नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

२०१२ साली राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पक्षाने राज्यातील गरीब जनतेचा विचार करून कित्येक कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. त्याशिवाय गोव्यातील लोकांसाठी आरोग्य विमा योजनाही सुरू केली होती. ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या होत्या, त्या सर्व योजना सुरू आहेत आणि भविष्यातही सुरू राहणार आहेत. कोणतीही कल्याणकारी योजना बंद करण्याचा सरकारचा विचार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सर्व योजना सुरू असून, राज्यातील हजारो लाभधारकांना या योजनांद्वारे दिली जाणारी आर्थिक रक्कम वेळच्या वेळी मिळत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. केवळ दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभधारकांना एक किंवा दोन महिन्यांचा विलंब होत असतो; मात्र अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ घेणार्‍यांना वेळच्या वेळी पैसे मिळत असतात. ज्या लाभधारकांना वेळेत पैसे मिळत नाहीत, त्यांनी त्या मागची कारणे शोधून काढावीत.
काही लाभधारक आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब करतात. परिणामी त्यांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.