सर्व सरकारी महामंडळानी आर्थिक विकास महामंडळा (ईडीसी) प्रमाणे कार्य करावे व नफा मिळवून स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ईडीसीने काल जमीन संपादन ठेवीवरील व्याजापोटी मिळालेल्या १२.८ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी धनादेश प्रदान कार्यक्रमाला ईडीसीचे चेअरमन सदानंद शेट तानावडे व ईडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
ईडीसी पुढील १५ दिवसांच्या आत ८४ लाख रुपये एवढा लाभांश सरकारला देणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी दिली. गेल्या वर्षी ईडीसीला ७३ कोटी रुपये एवढा नफा झाला होता, तर चालू वर्षी एप्रिल अखेरपर्यंत महामंडळाला ५२ कोटी रुपये एवढा नफा झाल्याची माहितीही तानावडे यांनी यावेळी दिली.