धरणे तुडुंब पण राज्यात पाणी टंचाई

0
27

>> मुबलक साठ्यानंतरही अनेक गावांत पाणी समस्या

राज्यातील साळावली, अंजुणे, आमठणे, पंचवाडी, चापोली, गावणे-काणकोण येथील धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तरीही, राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलस्रोत खात्याकडून राज्यात पाण्याचा पुरवठा करणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो.

धरणात मुबलक पाणी
राज्यातील साळावली या प्रमुख धरणामध्ये ६० टक्के पाण्याचा साठा आहे. साळावली धरणामध्ये १ जून २०२१ रोजी ३१.४३ मीटर पाण्याचा साठा होता. पावसाळ्यात धरण पूर्ण भरले होता. आत्ता पाण्याचा साठा ३६.१० मीटर एवढा आहे. सांगे तालुक्यातील साळावली धरणातून दक्षिण गोव्यातील सासष्टी, मुरगाव तालुक्यातील अनेक भागात पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणामध्ये ४३ टक्के पाण्याचा साठा आहे.
आमठाणे धरणामध्ये ६५ टक्के, पंचवाडी धरणामध्ये ३८ टक्के, चापोली धरणामध्ये ६५ टक्के तसेच गावणे धरणामध्ये ५९ टक्के पाण्याचा साठा आहे.

तिसवाडी आणि फोंडा तालुक्यात पाण्याचा पुरवठा करणार्‍या ओपा पाणी प्रकल्पाला खांडेपार नदीतून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलस्रोत खात्याने ओपा पाणी प्रकल्पाला सुरळीत पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खांडेपार नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधलेले आहे.
ओपा प्रकल्पातील पाण्याचा पातळी कायम राखण्यासाठी खांडेपार नदीवरील बंधार्‍यातून पाण्याची उपलब्ध केले जात आहे.