>> सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ
देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. काल सलग पाचव्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १६ दिवसांत पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी महागले आहे. गोव्याचा विचार केल्यास २२ मार्चपूर्वी राज्यात पेट्रोलचा दर ९६.३८ रुपये प्रति लिटर होता, तो आता १०६.४५ रुपयांवर पोहोचला आहे. डिझेलचा दर ८७.२७ रुपये प्रति लिटर असा होता, तो आता ९७.३३ रुपयांवर पोहोचला आहे.
चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर २२ मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ १६ दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. कालची दरवाढ ही १६ दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल १० रुपयांनी महागले आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणार्या मुंबईत पेट्रोलचे दर १२० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल १२०.५१ रुपये आणि प्रति लिटर डिझेल १०४.७७ रुपयांवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९६.६७ रुपयांवर पोहोचले आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत; परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर ९-१२ रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत ८५ टक्के आयातीवर अवलंबून आहे. १६ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. वाहनांच्या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जनता हैराण झाली आहे.
सीएनजीच्या दरातही वाढ
देशात सीएनजीवरही महागाईने आक्रमण केले आहे. देशाच्या राजधानीचे शहर असणार्या दिल्लीत सीएनजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजी गॅसच्या दरात २.५० रुपयांनी वाढ केल्यानंतर आता सीएनजीचे दर ६६.६१ रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या ५ दिवसांत सीएनजी ६.६० रुपये किलोने महागला आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत ७ रुपयांची वाढ झाली आहे.
गोव्यात देखील वाहनचालकांना इंधन दरवाढीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात काल पेट्रोल ८१ पैशांनी, तर डिझेल ८० पैशांनी वाढले. परिणामी आता राज्यात एक लिटर पेट्रोलसाठी १०६.४५ रुपये मोजावे लागत आहेत, तर एक लिटर डिझेलसाठी ९७.३३ रुपये द्यावे लागत आहेत.
राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ही ‘प्रधानमंत्री जन धन लूट योजना’ असल्याचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. २०१४ मध्ये मोटारसायकल, कार, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या पेट्रोल टाक्या भरण्याच्या किमतीचा सध्याच्या किमतीशी तुलना करणारा आलेख त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.