गट नेता, प्रदेशाध्यक्ष निवडीवरून कामत नाराज

0
31

दोन्ही पदांबाबत विश्‍वासात न घेतल्याने नाराजी; कॉंग्रेस कार्यकर्ते संतप्तकॉंग्रेसने काही दिवसांपूर्वीच आपला विधिमंडळ गट नेता आणि नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर केली; मात्र या निवडीवरून आता नाराजीनाट्य रंगले आहे. विधिमंडळ गट नेता आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडताना विश्‍वासात न घेतल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार दिगंबर कामत हे नाराज बनले आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून, या प्रकारावरून कॉंग्रेस कार्यकर्ते व त्यांचे हितचिंतक देखील संतप्त झाले आहेत.

कठीण काळात कॉंग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी दिगंबर कामत यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. सर्व गोवाभर फिरून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला, असे असताना देखील केंद्रीय पक्ष नेतृत्त्वाने कामत यांना विश्‍वासात न घेता विधिमंडळ गट नेता आणि प्रदेशाध्यक्षांची निवड केली, यावरून कॉंग्रेसचे कार्यकर्तेे व त्यांच्या हितचिंतकांनी संताप व्यक्त केला. मडगाव मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांनी एक बैठक घेऊन पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच कामतांवर पक्षत्याग करण्यासाठी दबाव आणला आहे. याबाबत गट समितीशी संपर्क साधला असता, त्यांनी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेत्यावर अन्याय केल्याचे सांगितले.

पक्षाचे बहुतांश आमदार पक्ष सोडून गेले असताना देखील तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांनी पक्ष मजबूतीसाठी फार मोठे प्रयत्न केले व पक्षात चैतन्य निर्माण केले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी महत्त्वाच्या पदांवर नेमणूक करताना कामत यांना विश्‍वासात घ्यायला हवे होते, असे निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षश्रेष्ठींनी एकतर्फी निर्णय घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

…तर कामतांनी पक्षत्याग करावा
या अन्यायाबद्दल राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांना जाब विचारावा आणि ते कार्यकर्त्यांचे मत ऐकणार नसतील, तर दिगंबर कामत यांनी पक्षत्याग करावा, असा सूर कार्यकर्त्यांनी आळवला आहे.

पक्षश्रेष्ठींनी आपणास अंधारात ठेवले : दिगंबर कामत
आमदार दिगंबर कामत यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपणास अंधारात ठेवून विधिमंडळ गट नेता व प्रदेशाध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या निर्णयाने कार्यकर्ते बरेच नाराज झाल्याचेही ते म्हणाले.

कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ आमदार भाजपच्या वाटेवर

>> प्रवेशानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक महिना देखील उलटलेला नसतानाच काल कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
हा दिग्गज नेता लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आल्यानंतर त्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची चर्चा आहे.

पक्षश्रेष्ठींनी हल्लीच कॉंग्रेस विधिमंडळ गट नेत्याची निवड करताना आपणाला विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप या आमदाराने केला आहे. आपणावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर आपले कार्यकर्ते नाराज झालेले असून, आपण पक्षाचा राजीनामा द्यावा, यासाठी ते आपल्यावर दबाव आणू लागले असल्याचे सदर आमदाराने खासगीत आपल्या मित्रपरिवाराला सांगितले असल्याचे वृत्त आहे. सदर आमदाराने यापूर्वी देखील एकदा भाजपमध्ये प्रवेश केला होता.