>> पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ
भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती दरवाढीचे सत्र काही केल्या थांबत नसून, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे. काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ८० पैशांनी वाढ झाली. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत १३ वेळा वाढ झाली असून, पेट्रोल ९.६४ रुपयांनी महागले आहे.
दिवसागणिक वाढणार्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांना फटका बसत आहे. २२ मार्चपासून सुरू झालेले इंधन दरवाढीचे सत्र आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. गेल्या १५ दिवसांपैकी २४ मार्च आणि १ एप्रिल हे दोनच दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल न झाल्याने दर स्थिर होते. भारतीय तेल कंपन्यांनी काल पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८०-८० पैशांनी प्रतिलिटर वाढ केली. मुंबईत पेट्रोलच्या दरांत ८४ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरांत ८५ पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ११९.६७ रुपये प्रति लिटरवर, तर डिझेल १०३.९२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
गोव्यात पेट्रोल १०५.६४ रुपये
गोव्यात काल पेट्रोल ८० पैशांनी, तर डिझेल ८१ पैशांनी महागले. परिणामी राज्यात पेट्रोलचे दर १०५.६४ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ९६.५३ रुपये प्रति लिटर असे वाढले आहेत.