गजानन नार्वेकर एक हरहुन्नरी कलाकार

0
37
  • – गजानन यशवंत देसाई

गजानन म्हणजे उत्साहाचा खळखळता झरा. त्याने साखळी परिसरातील संगीत, नाट्य, भजन आणि सांस्कृतिक जगतात आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. साखळीतील कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, गजाननचा तिथे सहभाग नाही असे होऊच शकत नाही.

गीत-रामायण आठवलं की माझ्या नजरेसमोर गजानन नार्वेकर उभा ठाकतो! तसा तो त्याच गोष्टीसाठी दुसर्‍यांनाही आठवेल असं नाही.
ज्या प्रसंगाने माणसं एकमेकांना पहिल्यांदा भेटतात, त्या-त्या प्रसंगानुरूप तो-तो माणूस जोडला जातो. या सगळ्या गोष्टी तशा खूपच मजेशीर असतात. कोण कुठला माणूस भेटल्यावर कुठला प्रसंग आठवेल काही सांगता येत नाही. त्यानंतर अनंत वेळा त्या माणसांना भेटलेला असतो पण आठवणींच्या कक्षांत राहतो तो ‘तो’ प्रसंग आणि ‘ती’ घटना. १९७० च्या दशकात गीत-रामायणाने महाराष्ट्रासकट गोमंतकालाही अक्षरशः वेड लावलं होतं! गदिमांचे शब्द आणि बापूजींचे स्वर प्रत्येकाच्या मुखातून स्रवत असत.

‘स्वयें श्री रामप्रभू’पासून ‘माते न तू वैरिणी’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला’, ‘नकोस नौके परत फिरू’ ते ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’- आजोबांपासून नातरांपर्यंत सर्वांच्याच ओठी ही गाणी असायची.
साधारण १९७६-७७ च्या दरम्यान कोठंबी गावात बापूजींचा म्हणजेच सुधीर फडके यांचा गीत-रामायणाचा कार्यक्रम ठेवला होता. औचित्य होतं, श्रीचंद्रेश्वराची मूर्तिस्थापना. कार्यक्रम अगदी जवळून म्हणजे दहा फुटांवरून ऐकण्याचे आणि पाहण्याचे भाग्य आम्हा मुलांना लाभले होते. ‘माता न तू वैरिणी’ हे गीत त्यांनी ज्या आवेशाने सादर केले, ते ऐकल्यानंतर भरताचे बंधुप्रेम आणि कैकयीचा स्वार्थीपणा हा जीवन जगण्याचे प्रमाण बनून राहिला. त्यानंतर पुढील आयुष्यात कधी कुणाच्या वागण्याला वेगळी फुटपट्टी लावावी लागली नाही.
वेळगे गावात राहायला आल्यावर हेच गीत रामायण मी परत एकदा, तेही दोन लहान मुलांच्या तोंडून ऐकलं.
त्यावेळेच्या मराठी शाळेत सरस्वती पूजनाचा उत्सव होता. त्या प्रीत्यर्थ गीत-रामायणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि सादर करत होती दोन शाळकरी लहान मुलं! बहीण साधारण बारा वर्षांची आणि धाकटा भाऊ आठ-दहा वर्षांचा! संपूर्ण गीत-रामायण नसेल पण त्यातली निवडक गीते ती दोघे सादर करत होती. साखळीतील कुणीतरी नार्वेकर किंवा काणेकरपैकी कुणीतरी असावेत एवढेच ठाऊक होते. पण त्या लहान भावंडांचा तो गीत-रामायणाचा कार्यक्रम मात्र कायम लक्षात राहिला. त्यातला तो धाकटा भाऊ गजानन नार्वेकर होता हे खूप वर्षांनी मला समजले. म्हणूनच आजही मला गीत-रामायण आठवलं की गजाननच आठवतो.
साखळीत आल्यावर गजाननबरोबर जवळीक वाढत गेली. त्याला एक कारण होतं, ते म्हणजे, ‘संगीत.’ सुरुवातीला गीत-रामायणाच्या माध्यमातून संगीताच्या दुनियेत पदार्पण करणारा गजानन नंतर स्थिरावला तो तबला कलाकार म्हणून.

साखळीतील नार्वेकर घराणी ही सर्वच व्यावसायिक पार्श्वभूमी असलेली. गजानन याचे घराणेही पारंपरिक दुकानदार. साखळीतील त्यांच्या दुकानात जर नजर फिरवली तर त्यांच्या जुन्या पिढीतील व्यवहाराचा व्याप लक्षात आल्याशिवाय राहत नाही. गजानननेसुद्धा आपल्या परीने भर बाजारात आपले दुकान थाटले. पण हा संगीताचा वेडा पुजारी. याचे पाय त्या दुकानात स्थिरावले तरच नवल! हा कायम आपला सदरा घालून संगीत साधनेत व्यस्त!
गजानन म्हणजे उत्साहाचा खळखळता झरा. त्याने साखळी परिसरातील संगीत, नाट्य, भजन आणि सांस्कृतिक जगतात आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. साखळीतील कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, गजाननचा तिथे सहभाग नाही असे होऊच शकत नाही. ‘गजा नार्वेकर म्हणजेच सांस्कृतिक कार्यक्रम’ असे एक समीकरणच होऊन बसले आहे.

साखळीच्या राधाकृष्ण मंदिरातील कुठलाही वार्षिक कार्यक्रम असू द्या, गजानन तबल्यावर नाही असे सहसा होत नाही. विठ्ठलापूरमधील पांडुरंगाच्या चैत्रेला नाचणार्‍या वीरभद्राची पावले थिरकतात ती गजाच्या तबल्याच्या तालावर. नवरात्रांत किंवा इतर वेळी महाराष्ट्रातून कीर्तनकार आले की तबल्याच्या साथीला गजा नार्वेकर! सार्वजनिक गणेशोत्सवात असणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांत गजानन भाग घेत नाही असे अभावानेच दिसेल. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांत भाग घेणारा गजानन शिगमोत्सवातसुद्धा त्याच उत्स्फूर्तपणे भाग घेणार. शिगमोत्सवाच्या कार्यक्रमात किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात परीक्षक कोण असावेत असा प्रश्‍न पडला की गजा नार्वेकर यादीच पुढे करील!
२०१७ मध्ये अखिल गोमंतकीय मराठी साहित्य परिषदेने साहित्य संमेलन भरवले होते. दिंडी पथकांची व्यवस्था कोण करणार? गजाननशिवाय दुसरं नावच आलं नाही! अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तोडीची दिंडी गजाननने घडवून आणली होती.

परमेश्वर प्रत्येक माणसाला एक कार्य ठरवून जन्माला घालतो. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर व्हावे किंवा शिक्षकाच्या मुलाने शिक्षक व्हावे हे अलिखित नियम माणसाने तयार केले आहेत; नाहीतर एका व्यवसाय करणार्‍या वैश्य कुटुंबात जन्माला आलेला गजानन कलेच्या क्षेत्रात रमलाच नसता! मनात आणलं असतं तर एक चांगला व्यवसाय तो निवडू शकला असता. भर साखळी बाजारात चांगले प्रशस्त दुकान असूनही गजा क्वचितच त्या दुकानात दिसेल!
काही वर्षांपूर्वी श्रावण महिन्यात साखळी मतदारसंघातील सर्व गावांमध्ये एखादे तरी कीर्तन घडवून आणावे अशी इच्छा आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलून दाखवली. आम्ही तयारी सुरू केली. कीर्तनकार म्हणून जबाबदारी अर्थातच माझ्यावर होती. त्यावर्षी जवळजवळ पन्नास कीर्तनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या गावांत, वेगवेगळ्या कीर्तनकार बुवांच्या साथीने करण्यात आले. या उपक्रमात मला मदत झाली ती गजाननची. कीर्तनकार बुवा शोधून त्यांना साथीदार देण्यापर्यंत सर्व व्यवस्था लावण्यात गजाननचा वाटा होता.
रवींद्र भवनमध्ये बालभवनची शाखा सुरू झाली आणि गजाननाला एक आवडीचं क्षेत्र उपलब्ध झालं. तबला शिक्षक म्हणून गजानन बालभवनमध्ये कार्यरत झाला. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना तो तबला शिकवू लागला. माझा मित्रच माझ्या मुलाचा गुरू बनला. गजाननाच्या मार्गदर्शनाखाली मुलाची तबलावादनात होणारी प्रगती पाहून मी हरखून जात होतो. माझे अर्धवट राहिलेले स्वप्न माझ्या मुलाकडून पूर्णत्वाला जात होते. पण नियतीला ते मान्य नसावे. भरली मैफील अर्धवटच राहिली.

असं म्हणतात की माणसाने एखादा तरी छंद जोपासावा. व्यवसायाने उदरनिर्वाह होईल हे नक्की, पण छंदाने जीवन सुखावह होईल. छंद ही अशी एकमेव गोष्ट आहे, ज्यामुळे जीवनात येणार्‍या कुठल्याही संकटातून मार्ग काढण्यासाठी ऊर्जा हवी असते ती ऊर्जा छंदामुळे मिळत जाते! छंद नसेल तर जीवन निराश बनलेच म्हणून समजा. आणि इथे तर गजानन छंदालाच जीवनाचा दर्जा घेऊन बसलाय! अशा माणसाला अवलिया नाही म्हणायचे तर काय म्हणणार?
गजाननाचे वडील श्री. विठ्ठल नार्वेकर हे त्या काळातील संगीत कलाकार होते. प्रामुख्याने ते हार्मोनिअम वाजवायचे. रामदास कामतांसारखे दिग्गज त्यांच्या घरी यायचे. मैफिली रंगायच्या. गोमंतकातीलसुद्धा बर्‍याच कलाकारांचे सान्निध्य त्यांना लाभले होते. त्यामुळे गजाला संगीताचे बाळकडू घरातच मिळाले म्हटल्यास वावगे ठरू नये.

गीत-रामायणाचे धडे त्याला त्याच्या वडिलांकडूनच मिळाले होते. गोमंतकभर जवळजवळ पन्नासच्या वर कार्यक्रम त्याकाळी गजाननने केले आहेत. तीन तासांत मावेल असा कार्यक्रम गजानन करायचा. सोबतीला बहीण, हार्मोनिअमवर स्वतः वडील, तबल्यावर कुणीतरी असायचे. निवेदन आजचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक विजयकुमार वेरेकर करायचे.
जीवनात संधी वारंवार येते असे नाही. ज्याने त्यावेळी आलेल्या संधीचे सोने केले, तो जिंकला; नपेक्षा तिथेच राहिला!
आता आहे त्यापेक्षा खूप मोठं व्हायची संधी गजाननला होती, पण आपलं नशीब म्हणून जी काही गोष्ट असते, तिथं सर्वकाही संपलेलं असतं. हिंदीत एक म्हण आहे ‘समय से पहले और किस्मत से जादा कुछ नहीं मिलता!’ म्हणी अनुभवाने तयार झालेल्या, म्हणूनच त्यांना खोटं म्हणता येत नाही.
गजाननला गाणं, तबला शिकण्यासाठी सरकारकडून म्हणजे कला अकादमीमार्फत मुंबईला जाण्याची सुवर्णसंधी आली होती. ती संधी पकडली असती तर गजानन हे नाव फक्त साखळीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच झाले असते. पण या जर-तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो. आज समोर जे काही असतं ते सत्य असतं.

प्रताप नावेलकर आणि नंतर मारुती कुर्डीकर सारख्या गुरूंकडून गजानन तबला शिकला. आपल्याजवळ असलेल्या साधनांच्या जोरावर तो आज त्या कलेची पूजा करतो आहे.

आजचा ’दवबिंदू’ कलाकारावर लिहायचा होता आणि तोही साखळीतील.गजानन नार्वेकर शिवाय दुसर्‍या कुणावर लिहिणार? जो आपल्या कलेने संपूर्ण साखळी व्यापून राहिला आहे!

एक कलाकार म्हणून गजाननाचे छोटे मोठे सत्कार साखळी परिसरात खूप झाले आहेत. पण कलाकारांचे एक स्वप्न असते की एखादा तरी शासकीय पुरस्कार आपल्याला मिळावा, ज्या योगे जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान मिळेल.

हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या नम्र कलाकाराला पुढील आयुष्यात हे साध्य होईलही.

मागे एकदा त्याला सहज म्हटलेलं, ’गजा, गोव्यात उत्तर भारताच्या धर्तीवर भागवत सप्ताह सांगणारे कोणीही नाहीत. आपण सुरुवात करूया का?’
त्याचं उत्तर होतं,’हो गजा तू तयारी कर, मी तयार आहे.’

स्वप्नं सदाच मोठीच पाहायची असतात. पण खरंच सांगतो, गजाननामध्ये खळखळणार्‍या त्या प्रचंड उत्साहाला मात्र माझे कोटी सलाम…!