- – ज. अ. रेडकर
कोकणातील आरवली या चिमुकल्या गावात एका छोट्याशा मंदिरातील सामान्य पुजार्याच्या पोटी जन्मलेला हा छोटा बाळ आज असामान्य होऊन कलाक्षेत्राचे आभाळ व्यापून राहिला आहे. जागतिक कीर्तीचा हा अलौकिक चित्रकार आपल्या वडिलांचे पारंपरिक पूजाव्रत सांभाळतो आहे.
माणसाचे जसजसे वय वाढत जाते आणि वार्धक्य येते तसतशी त्याची गात्रे शिथिल होत जातात. नजर मंदावते, ऐकायला कमी येते, हातपाय लटपटू लागतात, कुणाच्या आधाराशिवाय जीवन जगणे कठीण होऊन बसते. ज्यांची मुलेबाळे दूरदेशी असतात त्यांची परिस्थिती तर अगदीच दयनीय होऊन बसते. वार्धक्यात तर स्मरणशक्ती खूपच दगा देते. खूप दिवसांनी व्यक्ती भेटल्या की त्यांची ओळख पटत नाही. अनेकांची नावेदेखील आठवत नाहीत. तरुणपणी पाहिलेले चित्रपट, नाटके आणि त्यातील कलाकार यांची नावे आठवत नाहीत. वाचलेल्या पुस्तकांचे मथळे आठवत नाहीत आणि ते संदर्भ सांगणारा माणूस जवळ असत नाही. मग माणूस अस्वस्थ होतो, चिडचिडा बनतो. तारुण्यात असेपर्यंत स्मरणशक्ती तल्लख राहते. बालपणीच्या आठवणी स्पष्ट आठवतात.
श्रीपाद अमृत गुरव हा एक तरुण चित्रकार. एकेदिवशी कुलदेवतेच्या दर्शनासाठी मी सपत्नीक गावी गेलो असता त्या मंदिरात याची भेट झाली. देवतेला प्रसाद चढवण्याचे आणि कोकण परंपरेनुसार गार्हाणे घालण्याचे काम हा तरुण तिथे करीत असतो. देवतेला खणानारळाची ओटी दिली, गाभार्याला प्रदक्षिणा घातल्या आणि काहीवेळ मूर्तीसमोर बसलो. हा तरुण मी मंदिरात आल्यापासून माझ्याकडे न्याहाळून पाहत होता. मला कळेना असे तो का बघतो आहे. शेवटी त्याने माझ्या पत्नीला धाडस करून विचारले, ‘‘हे तुमचे मिस्टर गोव्यात शिक्षणाधिकारी होते का? मला त्यांना पाहिल्यासारखे वाटते.’’ पत्नी म्हणाली, ‘‘हो, पण या गोष्टीला खूप वर्षे झाली. यांना निवृत्त होऊन आता वीस वर्षे होऊन गेली.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मी पुढे सरसावलो. ‘‘अरे, तुला कसे माहीत मी शिक्षणाधिकारी होतो हे?’’ तो म्हणाला, ‘‘माझे प्राथमिक शिक्षण पेडणे-केरी येथे झाले. मी तिथल्या प्राथमिक शाळेत शिकत असताना तुम्ही आमच्या शाळेत वार्षिक शाळा तपासणीसाठी आला होता. त्या शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत गुरव हे माझे काका.’’ त्याचे ते बोलणे ऐकून मी थक्क झालो. कारण मला तर कालपरवाच्या गोष्टी आठवत नाहीत, आणि हा मुलगा तीस-बत्तीस वर्षांपूर्वीची आठवण मला सांगत होता.
१९८५-८९ या कालावधीत मी पेडणे तालुक्याचा प्रशासकीय शिक्षणाधिकारी होतो. या दरम्यान कधीतरी केरी येथील या शाळेला मी भेट दिली होती आणि त्यावेळचा हा छोटा मुलगा तिथे शिकत होता. त्यावेळी त्याचे वय असेल सहा-सात वर्षांचे! परंतु त्या लहान वयात मला एकदाच पाहून त्याला माझी आठवण राहावी हे खरेच आश्चर्यकारक होते. मला ज्याने तब्बल तीस-बत्तीस वर्षांपूर्वी पाहिले होते तो हा तरुण आजही मला ओळखू शकतो. त्याच्या स्मरणशक्तीची कमाल वाटली. याचे कारण १९८५-८९ या काळात मी तरुण होतो. आता वयपरत्वे शरीर थकले आहे, चेहरा बदलला आहे, डोक्यावरचे त्यावेळचे काळेभोर छत्र जाऊन तिथे विरळ केशभार उरला आहे. भाळावर चंद्रकोर तयार झाली आहे. त्यावेळचा माझा फोटो मी आज पहिला तर तो मलाच ओळखू येत नाही; आणि अशा स्थितीत बत्तीस वर्षांपूर्वी ज्याने मला केवळ एकदाच पाहिले होते तो मी, त्याच्या स्मरणात कसा काय राहू शकलो?
मी शिक्षणाधिकारी असताना प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना भेटी देणे हे माझे नित्याचे काम होते. या कालखंडात कितीतरी गुणवंत आणि हरहुन्नरी शिक्षकांशी जशी भेट झाली तशीच विद्यार्थी आणि शिक्षण संस्था चालक यांचीही भेट झाली. अनेकांशी पुढे मैत्रीचे संबंध जुळले. रमाकांत गुरव, कृष्णा किनळेकर, नामदेव परब, रावजी जाधव हे त्यावेळचे पेडणे तालुक्यातील आदर्शवत शिक्षक होते. शालेय तपासणीच्या वेळी वर्गातील लहान मुलांशी संवाद करणे मला आवडायचे. त्यांना प्रश्न विचारणे, त्यांच्या कलागुणांचे कौतुक करणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगणे आणि त्यांच्यात रमून जाणे हे मला आवडायचे. कदाचित याच कारणाने मी त्या मुलांच्या लक्षात राहिलो असेन. चि. श्रीपादबाळ हा त्यातीलच एक! किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्यावेळची माझी वेशभूषा आणि माझा आवाज यात अद्याप तरी बदल झालेला नाही, हेदेखील कारण असू शकेल. काही का असेना पण इतक्या वर्षांनंतरही त्याने मला ओळखले हे आश्चर्यकारक होते.
त्यावेळचा हा छोटा श्रीपादबाळ आता तरणाबांड झाला आहे. त्याला दाढी-मिश्या आल्या आहेत. आल्तिनो- पणजी येथील कला महाविद्यालयातून त्याने चित्रकलेतील स्नातक पदवी मिळवली. सुप्रसिद्ध चित्रकार प्राचार्य श्री. महेश वेंगुर्लेकर सर हे त्याचे तिथले गुरू होत. गोव्याच्या कला महाविद्यालयातून चित्रकलेतील स्नातक पदवी घेऊनच हा युवक स्वस्थ बसला नाही, चित्रकलेतील अधिक ज्ञान मिळवण्यासाठी त्याने हैद्राबाद गाठले. तिथे सरोजिनी नायडू स्कूल ऑफ फाईन आर्ट येथे प्रवेश घेतला. पुढे सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैद्राबाद येथून प्रिंट मेकिंग या विषयात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. भारत सरकारची प्रिंट मेकिंग विषयासाठी याला दोन वर्षांची फेलोशिप मिळाली. दस्तुरखुद्द तत्कालीन महामहीम राष्ट्रपती आदरणीय श्री. ए. पी. जे. कलाम साहेब यांच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात आला. हे त्याचे केवढे मोठे भाग्य!
आज या तरुण चित्रकाराची पेंटिंग्ज देश-विदेशात पोहोचली आहेत. देशातील जवळजवळ सर्व राज्यांत त्याची चित्रप्रदर्शने नेहमी भरतात. युरोप आणि अमेरिकेतही त्याची चित्रप्रदर्शने झाली. कोकणातील आरवली या चिमुकल्या गावात एका छोट्याशा मंदिरातील सामान्य पुजार्याच्या पोटी जन्मलेला हा छोटा बाळ आज असामान्य होऊन कलाक्षेत्राचे आभाळ व्यापून राहिला आहे. असे असले तरी त्याचे पाय अजून तरी जमिनीवरच आहेत हे विशेष! वडिलांच्या नंतर कुटुंबाची जबाबदारी त्याने आपल्या शिरावर पेलली आहे. जागतिक कीर्तीचा हा अलौकिक चित्रकार आरवलीच्या एका छोट्या मंदिरात आपल्या वडिलांचे पारंपरिक पूजाव्रत सांभाळतो आहे. भक्तांच्या क्षेम-कल्याणासाठी देवतेच आशीर्वाद मागतो आहे.
आरवलीच्या सातेरी मंदिरात त्याच्याशी अचानक झालेली ही भेट मनात रूतून बसली ती त्याच्या अलौकिक स्मरणशक्तीचे नवल वाटल्याने!