श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारत सरकारकडून या वर्षी जानेवारीपासून २५० कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १९ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली आहे.
श्रीलंकेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शनिवारीच भारताने ४० हजार मेट्रिक टन डिझेलची खेप श्रीलंकेला पाठवली. भारताकडून अशी ही चौथी मदत आहे. या चार खेपांमध्ये १५०,००० मेट्रिक टनांहून अधिक जेट इंधन, डिझेल आणि पेट्रोल श्रीलंकेला नेण्यात आले आहे.
कर्ज देण्याची तयारी
भारताने श्रीलंकेला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार आहे. भारतातून तांदळाची निर्यात श्रीलंकेत तांदळाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे.
श्रीलंकेत सध्या इंधनाचा तुटवडा असून, इंधन दर आकाशाला भिडले असल्याने जनतेत असंतोष आहे. तसेच येथे वीजपुरवठाही विस्कळीत झाला असून, १३ तास भारनियमन केले जात आहे. त्यामुळे सरकारविरोधी हिंसक निदर्शने सुरू आहेत.
पंतप्रधानांचा राजीनामा?
पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडून राजीनामा अद्यापही स्वीकारण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर पंतप्रधान कार्यलयाने राजपक्षे यांच्या राजीनाम्याचे वृत्त ङ्गेटाळले आहे. राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीलंकेत संचारबंदी लागू
श्रीलंकेत देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही संचारबंदी शनिवारी सकाळी ६ वाजता लागू झाली असून ती आज म्हणजे सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत असेल. श्रीलंकेत विजेच्या भीषण संकटामुळे महागाई शिगेला पोहोचली आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पुरवठा आणि वीज कपात यामुळे श्रीलंकेत अशांतता पसरली आहे. श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीज खंडित झाल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत श्रीलंकातील परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. या विरोधात नागरिकांकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. राष्ट्रध्यक्षांच्या घराबाहेरदेखील निषेध करण्यात येत आहे.