शेततळीत बुडाल्यामुळे दोन मुलांचा मृत्यू

0
19

>> करमळे – केरी येथील दुर्दैवी घटना

>> दोन्ही मयत सख्खे बहीण-भाऊ

बागायतीमध्ये पाणी शिंपण्यासाठी खोदलेल्या शेततळीमध्ये बुडाल्यामुळे नव्या नाईक (९) आणि हर्ष नाईक (४) या दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल गुरूवारी दुपारी करमळे – केरी येथे घडली. या दुर्घटनेमुळे करमळे – केरी येथील नाईक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या बालकांचे आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. आई-वडील सकाळी कामावर गेल्यानंतर ही मुले जवळच असलेल्या आपल्या काकांकडे जात असत. तिथे त्यांचे आजी-आजोबाही राहतात. वडील दीपक नाईक यांचा हा भाऊ जवळच शंभर-दीडशे मीटर अंतरावर बागायतीजवळ राहतो. ही मुले या बागायतीमधून आपल्या या काकांच्या घरी ये-जा करायची.

गुरुवारी दुपारी दीपक नाईक हे घरी जेवणासाठी आल्यावर त्यांना घरी मुले दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या आई- वडिलांकडे चौकशी केल्यावर ही मुले काकाच्या घरी गेल्याचे सांगण्यात आले. पण जेवणाची वेळ झाली तरी मुले परतली नसल्याने दीपक नाईक यांनी भावाच्या घरी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी मुले केव्हाच निघून गेल्याचे दीपक यांना सांगितले. त्यामुळे दीपक हे बागायतीतून भावाच्या घरी मुलांना शोधण्यासाठी निघाले असताना वाटेतच पाण्याच्या तळीत दोन्ही मुले तरंगत असताना त्यांना दिसली. त्यांनी लगेच दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि ङ्गोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात नेले. तिथे डॉक्टरांनी ती दोन्ही मुले मृत झाल्याचे घोषित केले.
बागायतीत असलेल्या तळीत ही मुले कशी पडली, हे अद्याप समजू शकले नाही. ही मुले पाय घसरून पडली की पाण्यात उतरली होती, ते कळायला मार्ग नसल्याचे नाईक कुटुंबीयांनी सांगितले. ही माहिती कळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

नाईक कुटुंबावर आभाळ कोसळले
ही दोन्ही लहान भावंडे घरात असल्यामुळे दीपक नाईक यांच्या घरातील वातावरण हलके फुलके होते. दोन्ही भावंडे एकमेकांना कधीच सोडून राहात नव्हती. काकांच्या घरी दोघेही एकदमच जात होती. दोन्ही निरागस मुलांच्या मृत्युमुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवले आहेत. नव्या नाईक ही मुलगी प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होती. घटनास्थळी ङ्गोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक सी. एल. पाटील आणि पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी सहकार्‍यांसह धाव घेऊन पाहणी केली.