>> सर्व सदस्यांकडून अभिनंदन; आलेक्स सिक्वेरा यांचा २४ विरुद्ध १५ मतांनी पराभव
भाजपचे काणकोण मतदारसंघाचे आमदार रमेश तवडकर यांची काल गोवा विधानसभा सभापतिपदी निवड झाली. या पदासाठी दोन अर्ज सादर झाल्याने निवडणूक झाली, त्यात तवडकर यांची सरशी झाली. विरोधी कॉंग्रेस पक्षाचे सभापतिपदासाठीचे उमेदवार आलेक्स सिक्वेरा यांचा त्यांनी २४ विरुद्ध १५ मतांनी पराभव केला.
हंगामी सभापती गणेश गावकर यांनी ही निवडणूक घेतली. यावेळी कॉंग्रेसच्या ११, गोवा फॉरवर्डचा १, आम आदमी पार्टीच्या २ व रिव्होल्युशनरी गोवन्सच्या १ अशा १५ जणांनी विरोधकांचे उमेदवार आलेक्स सिक्वेरा यांना मते दिली. सत्ताधारी भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांना भाजपच्या १९, मगोच्या २ व ३ अपक्ष उमेदवारांची मते मिळाल्याने त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार आलेक्स सिक्वेरा यांचा २४ विरुद्ध १५ मतांनी पराभव केला.
मगोचे दोघे आमदार सुदिन ढवळीकर व जीत आरोलकर आणि ३ अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, चंद्रकांत शेट्ये व आंतोनियो वाझ यांनी रमेश तवडकर यांना मत दिले.
सभापतिपदी निवड झाल्याबद्दल काल रमेश तवडकर यांचे गोवा विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
यावेळी सुदिन ढवळीकर, विश्वजीत राणे, दिगंबर कामत, मायकल लोबो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, सुभाष फळदेसाई, उल्हास तुयेकर आदी सभागृहातील विविध नेत्यांनी तवडकर यांनी मंत्री म्हणून केलेल्या कामाबरोबर त्यांनी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.
यावेळी रमेश तवडकर यांनी जनतेने आणि सभागृहातील सदस्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेमाचा उल्लेख केला. आपणास खूप जणांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आज आपण जो कुणी आहे, तो या लोकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आहे, असेही त्यांनी सांगितले.