पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले

0
15

देशभरात इंधन दरवाढ सुरूच असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी काल पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली. देशभरात काल पेट्रोलच्या दरांत ८४ पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली. गोव्यात पेट्रोलच्या दरात ८१ पैशांची, तर डिझेलच्या दरात ७१ पैशांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या पेट्रोलचे दर १०१.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ९२.१० रुपये प्रति लिटर असे आहेत.

गेल्या ८ दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे सुरूच ठेवले आहे. त्यापैकी २४ आणि २८ मार्चला दरवाढ झाली नव्हती. परिणामी गेल्या ८ दिवसांत पेट्रोल ४.४० रुपयांनी, तर डिझेल ४.५५ रुपयांनी महागले आहे. नव्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर ८४ पैशांची तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल १००.२१ रुपये आणि डिझेल ९१.४७ रुपयांवर पोहोचले आहे.

विशेष म्हणजे देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरपासून इंधन दरवाढ झाली नव्हती. या काळात कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ३० डॉलरची वाढ झाली होती. मात्र, आता निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडत आहे.