>> नेता निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधींकडे; ठराव संमत
राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून प्रारंभ झाले असले तरी, कॉंग्रेस पक्षाला विधिमंडळ गटनेत्याची निवड करणे अद्याप करता आलेली नाही. काल कॉंग्रेसच्या ११ आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ नेता निवड करण्याचा अधिकार कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष विजयी झाल्यास केवळ पाच मिनिटांत विधिमंडळ नेत्याची निवड करण्याची घोषणा करणार्या कॉंग्रेसला निवडणूक निकाल जाहीर होऊन १९ दिवस उलटले, तरी विधिमंडळ गट नेत्याची निवड करता आलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा विधिमंडळ नेता कधी निवडला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेसच्या ११ आमदारांची बैठक विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात मंगळवारी सकाळी घेण्यात आली. या बैठकीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत, मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, कार्लुस परेरा, डिलायला लोबो, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडाल्फ फर्नांडिस यांची उपस्थिती होती. या बैठकीत विधिमंडळ नेता निवडीवर चर्चा करण्यात आली.
व्हिन्झी व्हिएगस आपचे विधिमंडळ नेते
आम आदमी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून बाणावलीचे आमदार व्हिन्झी व्हिएगस यांची निवड करण्यात आली आहे. आपच्या आमदाराच्या सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. गोवा विधानसभेत आपचे दोन आमदार आहेत. या बैठकीला आमदार व्हिएगस आणि आमदार क्रुझ सिल्वा याची उपस्थिती होती, अशी माहिती आपचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली.