सावंत २.० पर्वाला प्रारंभ

0
14

>> डॉ. सावंत दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध
>> ८ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
>> दोन टप्प्यात होणार मंत्रिमंडळ विस्तार
>> मगो-अपक्षांना भव्य शपथविधीपासून ठेवले दूर
>> पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
>> सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लावली हजेरी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सोमवारी झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर ८ भाजप आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व भाजपशासित सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि ८ ते १० हजार लोकांच्या साक्षीने डॉ. प्रमोद सावंत व अन्य आमदारांनी शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये विश्‍वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे व बाबूश मोन्सेरात या भाजप आमदारांचा समावेश होता. राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये काल सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी कोकणीतून शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर विश्‍वजीत राणे यांचे इंग्रजीतून शपथग्रहण झाले. ते राज्य मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री ठरले. त्यांच्यानंतर ज्येष्ठतेनुसार माविन गुदिन्हो यांचे शपथग्रहण झाले. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर रवी नाईक (हिंदी), नीलेश काब्राल (इंग्रजी), सुभाष शिरोडकर (हिंदी), रोहन खंवटे (कोकणी), गोविंद गावडे (कोकणी) व बाबूश मोन्सेरात (इंग्रजी) यांचे शपथग्रहण पार पडले.

न भूतो… अशा या शपथग्रहण सोहळ्याला स्टेडियमच्या आत ८ ते १० हजार, तर बाहेर घातलेल्या शामियान्यात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजराने व भाजप कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे या शपथग्रहण सोहळ्यावेळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री व अन्य भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
डॉ. प्रमोद सावंत व नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होताच सोहळ्याला उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भाजपच्या केंद्रीय व स्थानिक नेत्यांची मोठी फौज ही बाब देखील या शपथग्रहण सोहळ्याचे एक आकर्षण ठरली.

या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब कुमार देव, भाजपचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य काही नेते या सोहळ्याला काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.

या सोहळ्याला हजर असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, डॉ. चंद्रकांत शेटये, भाजपचे आजी-माजी अध्यक्ष व पदाधिकारी यांचा समावेश होता.

मगो, अपक्षांना दुसर्‍या टप्प्यात संधी
मंत्रिमंडळात आणखी तिघा जणांचा समावेश करण्यात येणार असून, त्या तिघांचे शपथग्रहण हे दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी होणार आहे. सोमवारी मंत्री म्हणून ज्यांचे शपथग्रहण झाले, ते सर्व भाजपचे आमदार असून, अपक्ष आमदार व मगोच्या आमदारांना या भव्य शपथविधी सोहळ्यापासून दूरच ठेवणे भाजपने पसंत केले. दुसर्‍या टप्प्यात कुणाकुणाचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल, त्याबाबत भाजपने कमालीची गुप्तता बाळगली असली, तरी सुदिन ढवळीकर यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे.
याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्षाचे एकमेव आमदार विजय सरदेसाई यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशीही चर्चा आहे. मात्र विजय सरदेसाई यांनी अजून तरी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे या वृत्तात किती तथ्य आहे, याचे उत्तर केवळ काळच देणार आहे.

हे’ आहेत नवे मंत्री
• विश्‍वजीत राणे • माविन गुदिन्हो
• रवी नाईक • नीलेश काब्राल
• सुभाष शिरोडकर • रोहन खंवटे
• गोविंद गावडे • बाबूश मोन्सेरात