प्रमोद सावंत घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
24

>> श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज होणार सोहळा

एका भव्य अशा सोहळ्यात आज सकाळी ११ वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये डॉ. प्रमोद सावंत यांचे मुख्यमंत्री म्हणून तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे शपथग्रहण होणार आहे. मात्र मंत्र्यांच्या नावांची घोषणा शपथग्रहण सोहळ्यावेळीच करण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शपथग्रहण झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावेही शेवटच्या क्षणी शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी जाहीर करण्यात आली होती. तीच पद्धत आज गोव्यात शपथग्रहणप्रसंगी अवलंबिण्यात येणार असल्याचे समजते.

प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात ११ मंत्र्यांना स्थान मिळणार असले तरी मंत्रिपदासाठीच्या दावेदारांची संख्या त्यापेक्षा बरीच जास्त असल्याने मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असल्याचे काल सूत्रांनी स्पष्ट केले.

मंत्रिपद नाही त्यांना महामंडळे
ज्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नाही त्यांना महामंडळे देण्यात येणार आहेत. मात्र भाजपच्या बहुतेक आमदारांचा हट्ट हा मंत्रिपदासाठीच आहे. पैकी दोघांची सभापती व उपसभापतीपदी वर्णी लागणार आहे. अपक्ष व मगोला मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार असल्याने काही भाजप आमदारांना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार आहे.

दरम्यान, शपथग्रहण सोहळ्यासाठीची तयारी काल जोरात सुरू होती. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गोवा विधानसभा इमारतीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. सकाळी ११ वा. होणार शपथग्रहण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री गोपनीयतेची शपथ घेतील.

मोदींची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती हे आजच्या शपथग्रहण सोहळ्याचे खास आकर्षण ठरणार आहे. तसेच भाजपची सत्ता असलेल्या १० राज्यांचे मुख्यमंत्री ह्या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.