लोलयेत बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

0
9

लोलये पंचायत क्षेत्रातील नेतुर्ली येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात दिलीप सतरकर हे जखमी झाले असून, त्यांच्यावर काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ते काणकोणच्या वीज कार्यालयाचे कर्मचारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात कुत्र्याचा पाठलाग करत दिलीप सतरकर यांच्या घरासमोर येऊन उभा ठाकला. कुत्रा मोठमोठ्याने भुंकत असल्याने सतरकर यांनी घराचा दरवाजा उघडला, तोच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, पाठीला आणि डोळ्याजवळ जखम झाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून बिबट्याला पिटाळून लावले; अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. जखमी अवस्थेत सतरकर यांना काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, वन खात्याच्या अधिकार्‍यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.