>> भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती; आता पंचायत, लोकसभा निवडणूक रणनीतीकडे देणार लक्ष
राज्यात भाजपच्या नवीन सरकारचा शपथविधी २१ मार्चनंतरच होणार आहे. भाजपच्या केंद्रीय समितीने नियुक्त केलेले निरीक्षक गोव्यात दाखल झाल्यानंतर भाजप विधिमंडळ गटनेता निवड आणि सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आता लोकसभेच्या २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीत राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जागांवर विजय मिळविण्यासाठी रणनीती तयार केली जात आहे. तत्पूर्वी, पंचायत निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते उतरणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विधानसभा निवडणुकीसंबंधी सादर केलेल्या अहवालात भाजपच्या निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच, भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आणि स्थानिक पक्षांच्या आमदारांची माहिती दिली आहे. भाजपच्या केंद्रीय पातळीवरून विधिमंडळ नेता निवड आणि मंत्रिपदासाठी आमदारांची निवड केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजप केंद्रीय मंडळाने नियुक्त निरीक्षक केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सहनिरीक्षक केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्याकडून भाजप विधिमंडळ गट आणि भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आणि पक्षाच्या आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या जाणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.
तानावडेंनी घेतली राज्यपालांची भेट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी संघटन सचिव सतीश धोंड यांच्यासमवेत दोनापावल येथे राजभवनात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची काल भेट घेतली. तानावडे यांनी राज्यपालांच्या भेटीबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. राज्यपालांची सदिच्छा भेट घेतल्याचे तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापूर्वी, भाजपचे आमदार विश्वजीत राणे यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती.
गटनेते पदासाठी स्पर्धा नाही : डॉ. सावंत
भाजपमध्ये विधिमंडळ गटनेते पदासाठी कोणतीही अंतर्गत स्पर्धा नाही, असा दावा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. विधानसभा निवडणुकीचा अहवाल केंद्रीय पक्ष कार्यकारिणीला सादर करण्यासाठी नवी दिल्ली येथे गेलो होतो. पक्षाच्या केंद्रीय समितीने नियुक्त केलेले निरीक्षक गोव्यात दाखल झाल्यानंतर विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सरकार स्थापनेची तारीख निश्चित केली जाणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
फालतू प्रश्न विचारू नका; विश्वजीत राणे भडकले
वाळपई मतदारसंघातील भाजपचे आमदार विश्वजीत राणे हे विधिमंडळ गटनेता निवडीसंबंधीच्या एका प्रश्नावरून पत्रकारांवर भडकले. आपणाला फालतू प्रश्न विचारू नका. आपण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मिरामार येथे आलो आहे. तुम्ही नेता निवडीचा प्रश्न भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विचारा, असे उत्तर चिडलेल्या स्वरात राणेंनी पत्रकारांना दिले.