गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि जगभरात कोरोना संसर्ग कमी झाला होता; मात्र आता कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चीन आणि काही आफ्रिकन देशांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दक्षिण कोरियामध्ये तर एका दिवसामध्ये तब्बल ६ लाख २१ हजार ३२८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात आढळणार्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.
दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात तब्बल ६ लाख २१ हजार ३२८ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच एका दिवसात येथे तब्बल ४२९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जभगरात कोरोनाची चौथी लाट येते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या दक्षिण कोरियामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८२ लाख ५० हजार ५९२ वर पोहोचली आहे.
दक्षिण कोरियाच्या आरोग्य विभागाने मार्चच्या मध्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. आरोग्य विभागाने मार्चमध्ये दररोज १ लाख ४० हजार ते २ लाख ७० हजारच्या आसपास रुग्ण सापडतील, असे भाकित केले होते. मात्र येथे अपेक्षापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत असून, आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.