आजपासून १२-१४ वयाच्या मुलांना लस

0
18

>> दुसरा डोस देणार २८ दिवसांनंतर

राज्यातील १२ ते १४वयोगटातील मुलांना आज बुधवार दि. १६ मार्चपासून कोविड साठीची लस देण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्य संचालनालयातील सूत्रांनी दिली.

या वयोगटातील मुलांसाठी खास तयार करण्यात आलेली कार्बेव्हॅक्स ही लस या मुलांना देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शन तत्वांनुसार ही लस देण्यात येईल. सर्वप्रथम राज्यातील आरोग्य केंद्रांतून ही लस देण्यात येणार आहे. सध्या मुलांच्या परीक्षा तसेच शिगमोत्सवाची सुट्टी आहे त्यामुळे मुलांना शाळेतून ही लस देण्यात येणार नाही. मात्र नंतर विद्यालयांतूनही ही लस देण्यात येणार आहे.

मुलांना लशीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. आपल्या मुलांना लस टोचून घेण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन खात्याने केले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांचे यापूर्वीच १०० टक्के लसीकरण झालेले आहे.

देशपातळीवरही लसीकरण
देशभरातही आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. सध्या देशातील ६० वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनावरील बुस्टर डोस दिला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनात केंद्र सरकारने वैद्यकीय संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.