माय-लेकीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळेच वळण

0
21

>> झाडाला लोंबकळणार्‍या स्थितीत आढळला मातेचा मृतदेह; लेकीच्या मृत्यूविषयी गूढ वाढले

ऐन शिगमोत्सवाच्या धामधुमीत तामणे-पैंगीण येथील माय-लेकीच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून, हा अपघात की घातपात, याविषयी शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. लेकीबरोबरच मातेचाही बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र आई माया पागी यांचा मृतदेह काल सकाळी एका झाडाला लोंबकळलेल्या स्थितीत आढळला. त्यामुळे या प्रकाराने ग्रामस्थांसह काणकोण पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

रविवारी सायंकाळपासून आई माया पागी व विवाहित मुलगी अंकिता या दोन्ही बेपत्ता होत्या. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी मुलगी अंकिता हिचा मृतदेह तामणे येथील त्यांच्या घरालगतच्या तळ्यात तंरगताना स्थानिकांना आढळला होता. पहाटे ३ वाजेपर्यंत शोध घेऊनही माया पागी यांचा पत्ता लागला नव्हता. तिचा शोध घेण्यासाठी तळ्याचा कोपरान्‌कोपरा अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि स्थानिकांनी ढवळून काढला होता; मात्र त्या सापडल्या नव्हत्या.

दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी तळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका झाडाला माया पागी यांचा लोंबकळलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला. जाळ्याच्या तुकड्याने गळफास घेतलेल्या स्थितीत त्या सापडल्या.

अंकिता हिचे वडील आनंद पागी यांचा दुसरा विवाह झाला होता आणि मृत माया पागी ही त्यांची दुसरी बायको होती, तर अंकिता हिची ती सावत्र आई होती. या दोन्ही माय-लेकींमध्ये बिनसले होते काय अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
दरम्यान, काल सायंकाळी शवचिकित्सेनंतर पैंगीणच्या स्मशानभूमीत माया पागी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.