सोनिया गांधीच करणार कॉंग्रेसचे नेतृत्व

0
10

>> चार तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काल नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत नेतृत्व बदल होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र चार तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सोनिया गांधीच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहतील, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सोनिया गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला; मात्र पक्षाच्या सर्व नेत्यांनी तो फेटाळून लावला.

सुमारे चार-साडेचार तास चाललेल्या या बैठकीत पाच राज्यांतील पराभवावर चिंतन करण्यात आले. कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत सोनिया गांधींनी राजीनामा सादर केला; पण पक्षाच्या सर्व नेत्यांनी सोनिया यांचा राजीनामा फेटाळून लावला. यावेळी सर्व पदाधिकार्‍यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवला. बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सोनिया गांधींनी पुढे येऊन पक्षाचे नेतृत्व करावे, संघटनेतील कच्चे दुवे करावेत, आवश्यक संघटनात्मक बदल करावेत, अशी विनंती त्यांना करण्यात आली.

दुसरीकडे, सोनिया गांधींच्या राजीनामा पत्रानंतर गुलाम नबी आझाद, अजय माकन, आनंद शर्मा यांनी नरमाईची भूमिका घेतली. आमचा सल्ला पक्षाच्या भल्यासाठी आहे. आम्हाला विरोधक किंवा शत्रू समजू नका, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

संसद अधिवेशनानंतर चिंतन शिबिर
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस लवकरच चिंतन शिबिराचे आयोजन करणार असून, ते संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आयोजित केले जाणार आहे.

कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील निर्णय त्याच घेतील. आम्हा सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.

  • मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस नेते.