भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गावात ७५ झाडे लावण्यात यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून दोन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आहेत. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांचा गुजरातमधील अहमदाबादमध्ये काल भव्य रोड शो झाला. त्यानंतर पंतप्रधानांनी गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित केले. यावेळी मोदी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशातील प्रत्येक गावात ७५ झाडे लावण्यात यावीत, असे आवाहन केले.