>> निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष लवकरच भाजप करणार राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
>> मगोच्या पाठिंब्याला भाजप आमदारांचा विरोध विद्यमान दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पदरी नामुष्कीजनक पराभव
>> बहुतांश फुटीर आमदारांना घरचा रस्ता अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांची पणजीत कडवी झुंज
>> २६ पैकी केवळ ३ महिला उमेदवार विजयी पाचपैकी तीन दांपत्यांचा झाला विजय; दोन दांपत्ये पराभूत
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या, अत्यंत अटीतटीच्या व उत्कंठावर्धक अशा गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला २० जागा मिळाल्याने राज्यात सलग तिसर्यांदा सरकार स्थापन करण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला सरकार स्थापनेसाठी मगो व अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे भाजपकडून लवकरच विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार असून, त्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत मोठ्या अपेक्षा बाळगून असलेल्या कॉंग्रेसला मात्र, केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले, तर किंगमेकर बनू पाहणार्या मगोची देखील निराशा झाली. आप व आरजीने राज्यात विजयाचे खाते खोलले असून, आपचे दोन व आरजीचा एक आमदार निवडून आला आहे.
काल सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असता, सुरुवातीचा कल हा खूपच उत्कंठावर्धक व अटीतटीचा ठरला. प्रत्येक फेरीनंतर विविध पक्षांच्या उमेदवारांना कमी-अधिक फरकाने आघाडी मिळत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धडधड वाढत होती. मात्र नंतर बहुतांश मतविभागाचा फायदा मिळवून अल्प आघाडीने का होईना; पण भाजपचे उमेदवार २० जागांवर निवडून आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक हे काहीशे मतांच्या फरकाने विजयी झाले. भाजपला केवळ एका जागेने स्पष्ट बहुमतापासून वंचित राहावे लागले. असे असले तरी अपक्ष आमदार व मगोने विनाविलंब पाठिंबा जाहीर केल्याने भाजपला सरकार स्थापनेसाठी जास्त कष्ट करावे लागणार नाही हे दिवसअखेर निश्चित झाले. त्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप नेत्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते.
दुसर्या बाजूला सर्वात मोठा पक्ष ठरेल, अशी आशा बाळगून असलेल्या कॉंग्रेसला ११ जागाच मिळाल्याने त्यांच्या गोटात शुकशुकाट होता. तसेच ५ ते ६ जागांची अपेक्षा बाळगून असलेल्या मगोला २ जागा मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांच्या चेहर्यावर निराशा दिसून आली.
भाजपने मगोचा पाठिंबा घेऊ नये : रवी नाईक
राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी मगोच्या पाठिंब्याची गरज नाही. माझ्यासह भाजपचे आमदार गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो यांचा मगोचा पाठिंबा घेण्यास विरोध आहे, असे भाजपचे आमदार रवी नाईक यांनी काल सांगितले. भाजपचे २० आणि ३ अपक्षांचा पाठिंबा सरकार घडवण्यासाठी पुरेसा आहे. आम्हाला मगोच्या पाठिंब्याची गरज नाही, असेही नाईक यांनी सांगितले.
पहिल्यांदाच तीन दांपत्ये विधानसभेत
गोवा विधानसभा निवडणुकीत एकाच वेळी तीन दांपत्ये निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण पाच दांपत्यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यापैकी बाबूश व जेनिफर मोन्सेरात, विश्वजीत व दिव्या राणे, मायकल व डिलायला लोबो ही दांपत्ये विजयी झाली, तर बाबू व सावित्री कवळेकर, किरण व कविता कांदोळकर यांचा पराभव झाला. मोन्सेरात व राणे दांपत्याने भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही दांपत्ये सत्तेत सहभागी होतील.
१२ पैकी ९ फुटीर पराभूत
कॉंग्रेस व मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांपैकी नीळकंठ हळर्णकर, बाबूश व जेनिफर मोन्सेरात विजयी झाले, तर क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्स, बाबू कवळेकर, इजिदोर फर्नांडिस, आंतोनिओ फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा. तसेच बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर) यांचाही पराभव झाला.
तीन महिला उमेदवार विजयी
या निवडणुकीत तब्बल २६ महिला उमेदवार विविध पक्षांच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यापैकी केवळ तिघांनाच विजयश्री लाभली. त्यात दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात व डिलायला लोबो यांचा समावेश आहे.
विधानसभेत तब्बल १९ नवे चेहरे
यंदाच्या निवडणुकीत तब्बल १९ नवेे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यात प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, दिव्या राणे, कृष्णा साळकर, उल्हास तुयेकर (सर्व भाजप), डिलायला लोबो, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस, कार्लूस फेरेरा, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, एल्टन डिकॉस्टा, युरी आलेमाव (कॉंग्रेस), डॉ. चंद्रकांत शेटये (अपक्ष), आंतोनिओ वाझ (अपक्ष), जीत आरोलकर (मगो), व्हेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा (वेळ्ळी), वीरेश बोरकर (आरजी) हे नवे चेहरे निवडून आले.
दिग्गज उमेदवार पराभूत
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना व विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात भाजपचे राजेश पाटणेकर, बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, जयेश साळगावकर, दयानंद सोपटे यांच्याबरोबरच तृणमूलचे चर्चिल आलेमाव व अपक्ष उमेदवार दीपक पाऊसकर हे पराभूत झाले.
आप, आरजीने खाते उघडले
राज्यात दुसर्यांदा निवडणूक लढवणार्या आम आदमी पक्षाला दोन जागा मिळाल्या, तर गोव्याच्या अस्मितेचे प्रश्न घेऊन रिंगणात उतरलेल्या मनोज परब यांच्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला एक जागा मिळाली. मोठा गवगवा करून गोव्यात दाखल झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या हाती भोपळा आला.
मगोचा अपेक्षाभंग
५ ते १० जागा जिंकून किंगमेकर बनू पाहणार्या मगोला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांची पुरती निराशा झाली. मगोला मडकई व मांद्रे अशा दोनच ठिकाणी विजय प्राप्त झाला. मडकईतून पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर व मांद्रेतून जीत आरोलकर हे नेते विजय झाले. प्रियोळ मतदासंघातून पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. डिचोलीतून दिग्गज नेते नरेश सावळ यांना विजयाने हुलकावणी दिली. त्यांचा अवघ्या ३१८ मतांनी पराभव झाला. पेडण्यात राजन कोरगावकर यांचा पराभव झाला. फोंडा मतदारसंघात मगोचे नेते केतन भाटीकर यांचा भाजपचे रवी नाईक यांनी अल्प आघाडीने निसटता पराभव केला.
तिघांचा पुन्हा विधानसभेत प्रवेश
२०१७ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गणेश गावकर, सुभाष फळदेसाई आणि रमेश तवडकर यांनी या निवडणुकीत विजयी होत पुन्हा विधानसभेत प्रवेश केला आहे. गणेश गावकर यांनी दीपक पाऊसकर यांचा, सुभाष फळदेसाई यांनी सावित्री कवळेकर यांचा, तर रमेश तवडकर यांनी इजिदोर फर्नांडिस यांचा पराभव केला.