भाजपची उत्तर प्रदेशात सलग दुसर्‍यांदा सत्ता

0
14

>> बहुमताचा आकडा गाठला; पण जागा घटल्या; कॉंग्रेस, बसपाचा सुपडा साफ

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सलग दुसर्‍यांदा सत्ता काबीज केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू पुन्हा चालली असून, त्यांच्यासमोर विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि बसपाचा सूपडा साप झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही, तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने लढत दिली; पण भाजपला सत्तास्थापनेपासून ते रोखू शकले नाहीत.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने २५५ जागांवर विजय मिळवला आहे. ४०३ विधानसभा जागा असणार्‍या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २०२ जागांची गरज आहे. भाजपने हा बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला १११ जागा मिळाल्या. कॉंग्रेसला केवळ दोन, तर तर बसपला फक्त एक जागा जिंकता आली. अन्य जागांवर प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली, तरी २०१७ च्या तुलनेत फटका बसला आहे. २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३१२ जांगावर विजय मिळवला होता. म्हणजेच यंदाच्या निवडणुकीत भाजपला ४३ जागांचा तोटा झाला आहे.
२०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक महत्वाची मानली जात आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, असे म्हटले जाते. त्यामुळे भाजपने उत्तर प्रदेश जिंकून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपले मनोधेर्य नक्कीचे वाढवले आहे.

३७ वर्षांनंतर सलग दुसर्‍यांदा
एका पक्षाचे सरकार

१९८०, १९८५ मध्ये पूर्ण बहुमताने कॉंग्रेसने सलग दोन वेळा सरकार घडवले होते. १९८० मध्ये ३०९ जागा, १९८५ मध्ये २६९ जागांसह कॉंग्रेस सरकार आले होते. त्याची पुनरावृत्ती ३७ वर्षांनंतर पुन्हा झाली आहे. उत्तर प्रदेशात २०१७ नंतर आता २०२२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार बनवत आहे.

योगींचा एक लाखांहून
अधिक मतांनी विजय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. त्यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. याच मतदार संघातून लढणार्‍या भीम आर्मीचे चंद्रशेखर यांचे डिपॉझिट जप्त झाले असून, त्यांना केवळ ५ हजार ४०९ मत मिळाली.

उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसची
दयनीय अवस्था

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक कॉंग्रेसने प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढली होती. कॉंग्रेसने सर्व ४०३ जागांवर आपले उमेदवार दिले होते. प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या घोषणेसह महिलांना ४० टक्के जागा दिल्या होत्या; पण २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी दारुण पराभव झाला आहे. कॉंग्रेसला ४०३ जागांपैकी फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले.

बसपाच्या अस्तित्वाचा
प्रश्न उपस्थित

उत्तर प्रदेश निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २००७ मध्ये एक हाती सत्ता मिळवणारा बसप पक्ष आता फक्त १ जागेवर सीमित झाला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपला १९ जागांवर यश मिळाले होते; मात्र २०२२ ची निवडणूक येता-येता पक्षात फक्त ३ आमदारच शिल्लक राहिले होते.

उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाचे
किती आमदार?
पक्ष आमदार
भाजप २५५
सपा १११
कॉंग्रेस २
बसपा १
अपना दल १२
जनसत्ता दल २
निर्बल आम दल ६
राष्ट्रीय लोक दल ८
भासप ६
एकूण ४०३