>> सर्व मतदारसंघांतील मतमोजणी एकाच वेळी होणार सुरू;
>> मतमोजणीची तयारी पूर्ण; ४ तासांतच निकाल येणार हाती
कधी नव्हे एवढी चुरशीची ठरलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दि. १० मार्च रोजी होत असून, उत्तर गोव्यासाठीची मतमोजणी आल्तिनो येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये, तर दक्षिण गोव्यासाठीची मतमोजणी मडगाव येथील दामोदर महाविद्यालयात होणार आहे. राज्याच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच सर्व मतदारसंघांतील मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे चार तासांतच सर्व मतदारसंघांतील मतमोजणी पूर्ण होणार असल्याची माहिती मतमोजणीशी संबंधित अधिकार्यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.
गुरुवारी होणार्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काल उत्तर व दक्षिण गोव्यातील मतमोजणी केंद्रांवर मंडप घालणे, मतमोजणीसाठी आवश्यक साहित्य आणणे, मीडिया हाऊसची व्यवस्था करणे, पोलीस बंदोबस्ताची सोय आदी कामे जोरात सुरू होती.
गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. ८ वाजता टपाल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल, तर ८.३० वाजल्यापासून मतदान यंत्रांमधील मतांची मोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी १५०० अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीची सगळी जबाबदारी या १५०० अधिकार्यांवर असेल. आल्तिनो-पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये उत्तर गोव्यातील १९ मतदारसंघांसाठीची मतमोजणी होईल, तर दक्षिण गोव्यातील २१ मतदारसंघांतील मतमोजणी मडगावच्या दामोदर महाविद्यालयात होईल.
सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल व गोवा सशस्त्र पोलीस दल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सर्व मतमोजणी खोल्या, स्ट्रॉंग रुम्स व मतमोजणीच्या अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उत्तर व दक्षिण गोवा जिल्ह्यातून ४० मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत ११.६४ लाख मतदारांपैकी ९ लाख २६ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी ७९.६१ टक्के एवढी होती.
अन्य चार राज्यांच्या निवडणुकांचाही आज निकाल
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, सर्वांना आता निकालाचे वेध लागले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले. गुरुवारी गोव्याबरोबरच पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या ५ राज्यांपैकी ४ राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार आहे. केवळ पंजाबमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या पाच राज्यांत काय निकाल लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या निकालाची जास्त उत्कंठा आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागांसाठी एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला २०२ जागा जिंकाव्या लागतील. या ठिकाणी भाजपची सत्ता असून, मतदानोत्तर चाचण्यांतून भाजपलाच बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागा आहेत. या ११७ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पंजाबमध्ये बहुमताचा आकडा ५९ हा आहे. सध्या पंजाबमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे; परंतु मतदानोत्तर चाचण्यांमध्ये या राज्यात आपची सत्ता येईल, असे भाकीत वर्तवले आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. सत्ताधारी पक्ष भाजपने गेल्या वर्षी तीन मुख्यमंत्री बदलले. येथे विधानसभेच्या ७० जागा असून, बहुमताचा जादुई आकडा ३६ आहे. उत्तराखंमध्ये देखील ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. यंदाच्या निवडणुकीत या राज्यात भाजप-कॉंग्रेसमध्ये कडवी लढत अपेक्षित आहे, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांतून वर्तवला आहे.
मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागा असून, येथे बहुमतासाठी ३१ जागा जिंकणे आवश्यक आहे. मणिपूरच्या ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांतील निकाल फार महत्त्वाचे आहेत.