रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला बारा दिवस उलटत आले तरी अजून रशियाला विजय दृष्टिपथात नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, त्यांचे सैन्य आणि आम जनता अत्यंत चिवटपणे आक्रमक रशियाचा मुकाबला करीत आहे. या संघर्षाची फलनिष्पत्ती युक्रेनच्या विद्ध्वंसात होण्याची चिन्हे तर दिसत आहेतच, परंतु संपूर्ण जगासाठी हे एक महासंकट उभे राहिले आहे आणि आपला भारतही त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकणार नाही.
जागतिक बँकेपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक यंत्रणा रशिया – युक्रेन संघर्षाचे आर्थिक परिणाम आजमावण्याच्या मागे लागलेल्या आहेत. कोरोना महामारीतून नुकतेच कुठे सावरू लागलेल्या जगाला पुन्हा एकवार आर्थिक संकटाच्या खाईत हे युद्ध लोटत चालले असल्याचे दिसू लागले आहे. हा संघर्ष येत्या आठवड्याभरात आटोक्यात नाही आला आणि असाच दीर्घकाळ चालत राहिला तर भविष्यात त्याचे भीषण आर्थिक परिणाम सर्व जगभर जाणवल्याशिवाय राहणार नाहीत.
सध्या युक्रेनमधून लाखो महिला आणि मुले निर्वासित होऊन आजूबाजूच्या युरोपीय राष्ट्रांमध्ये दाखल झालेली आहेत. त्यांच्या खाण्यापिण्यापासून राहण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्था त्या देशांना उभाराव्या लागणार आहेत हे तर झालेच, परंतु या संघर्षातून युक्रेनच्या संसाधनांची जी अपरिमित हानी रशियाने चालवलेली आहे, त्याचा फटकाही मोठा असेल. संपूर्ण जगाचा विचार केला तर युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांवर अनेक बाबतीत जगातील इतर देश अवलंबून आहेत. रशिया हा कच्च्या तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठा निर्यातदार देश आहे. युक्रेनमध्येही कच्चे तेल व नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे या युद्धाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय पुरवठा घटल्याने त्याचे दर कडाडत चालले आहेत. भारतामध्ये पाच राज्यांच्या निवडणुकांचा मोसम असल्याने केंद्र सरकारने आतापर्यंत तेल कंपन्यांना इंधन दरवाढीपासून थोपवून धरले असले तरी आता उत्तर प्रदेशातील अखेरच्या टप्प्यातील विधानसभा निवडणूकही आटोपली असल्याने तेल कंपन्यांना दरवाढीला मुक्तहस्त दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडेही पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती लवकरच कडाडतील.
केवळ कच्च्या तेलापुरता युद्धाचा हा परिणाम सीमित नाही. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश गहू, सूर्यफुलाचे तेल आदींचे जगातील सर्वांत मोठे निर्यातदार देश आहेत. युद्धामुळे या निर्यातीवर परिणाम झालेला असल्याने साहजिकच दरवाढ अटळ आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे युक्रेनमध्ये अत्यंत दुर्मीळ अशा प्रकारच्या भूगर्भीय धातूंचे उत्खनन होत असते. जगभरातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात वापरल्या जाणार्या सेमिकंडक्टर आणि कंप्युटर चीप्समध्ये वापरले जाणारे पॅलेडियम, स्कँडियम, सर्कीट बनवण्यासाठी वापरला जाणारा न्यूऑन वायू ह्या सर्वांमध्ये युक्रेनचे योगदान मोठे आहे. या युद्धामुळे त्या सार्या उत्पादनक्षमतेवर घाला घातला गेला असल्यामुळे जगभरातील इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगाला या गोष्टींचा तुटवडा भासू शकेल.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगाप्रमाणेच फार्मास्युटिकल उद्योगही युक्रेन आणि रशियावर अवलंबून आहे. भारतीय फार्मा कंपन्या युक्रेन व रशियात मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत असतात. सध्याच्या युद्धस्थितीमुळे ह्या सगळ्या व्यापारावर गंभीर परिणाम झालेला आहे.
रशियावरील आर्थिक निर्बंधांमुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारावर फार मोठा परिणाम झालेला दिसतो. आर्थिक निर्बंधांचा भाग म्हणून रशियाला बँकांना जोडणार्या स्विफ्ट प्रणालीतून वगळण्यात आल्याने त्या देशाच्या आयात निर्यातीच्या आर्थिक व्यवहारावरही मोठा परिणाम झालेला आहे. त्याच फटका भारतासहित जगभरातील निर्यातदारांना, आयात करणार्यांना बसेल. अशा अनेक प्रकारे या युद्धाच्या झळा जगाला बसू लागल्या आहेत आणि जसजसे हे युद्ध लांबत जाईल तसतसा त्याचा दबावही वाढत जाईल. युक्रेनने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आतापासूनच मदतीची याचना चालवलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे तातडीच्या १.४ अब्ज डॉलर्सच्या मदतीची मागणी केली गेलेली आहे. युक्रेनपुरत्या या युद्धाच्या झळा आता सीमित राहणार नाहीत. आज जागतिकीकरणाचे युग असल्यामुळे अगदी अपरिहार्यपणे तुमच्या आमच्या खिशापर्यंत या ना त्या प्रकारे त्या येऊन पोहोचणार आहेत. या संकटाला संपुष्टात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून व्यापक प्रयत्न झाल्याखेरीज रशियाची युद्धखोरी थांबणार नाही आणि जगावरील टांगती तलवारही दूर होणार नाही.