‘जाणिवांचा विस्तार करू’ हाच निर्धार!

0
40
  • – पौर्णिमा केरकर

निकोप समाज घडविण्यासाठी स्त्रियांनी तत्पर असायला हवे! खरे ज्ञान कधी लिंगभेद मानीत नाही. गरज आहे साचलेपणाला आव्हान देणार्‍या विचारांची! निश्चय आणि धैर्याच्या सोबतीने नवनव्या क्षितिजापर्यंत स्वतःला विस्तारत नेता येण्याची! विचारातील सकारात्मक नावीन्य ही खरी नव्या सहस्रकातील आपली ओळख आहे. याची जाणीव जेव्हा तीव्रतेने होईल तोच खरा महिलादिन..!!

२०२० सालचा पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीमती तुलसी गौडा पर्यावरणातील ज्ञानकोश म्हणून त्या परिसरात सुपरिचित आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना या बाई आपल्या पारंपरिक वेशभूषेत होत्या. पुरस्काराने सन्मानित आणि या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या मांदियाळीत कर्नाटकाच्या एका खेड्यातील ही महिला सुरकुतलेल्या चेहर्‍याची, गळ्यात पारंपरिक दागिने तसेच पारंपरिक दैनंदिन वापरात असलेले लुगडे नेसून चक्क अनवाणी पायांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी अतिशय शांत, संयत, कोणताही अभिनिवेश न बाळगता व्यासपीठाकडे चालली होती. ‘पुरस्कारामुळे ती मोठी झाली की तिच्यामुळे पुरस्काराचा सन्मान वाढला?’ दूरदर्शनवर हे चित्र पाहत असता हा विचार सहजच मनात डोकावला. ‘पद्मश्री’ नावाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो आणि तो अशा कामासाठी देण्यात येतो हे तर तुलसी अम्माच्या गावीही नसणार. त्यांच्या अविरत कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ही स्त्रीत्वाच्या विचारशक्तीची ताकद आहे. महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोरे याही अशाच गावच्या अस्सल मातीतून तावून-सुलाखून निघालेल्या. पारंपरिक बी-बियाण्यांचे जतन, संवर्धन करून आपल्या पूर्वजांनी ही बियाणी राखून ठेवली. बदलत्या जीवनशैलीत भूमिपुत्रांचा कल बदलला; मात्र राहीबाई मुळांना घट्ट चिकटून राहिल्या. संशोधन करून शास्त्रज्ञ होणार्‍या, डॉक्टरेट मिळविणार्‍यांना त्यांचा आपल्या संशोधनासाठी विचार करावा लागला. पद्मश्रीप्राप्त या दोन्ही महिला जगातील कोणत्याही शाळा-कॉलेजमध्ये कधीच गेल्या नाहीत. जगण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी जगाच्या शाळेतून आत्मसात केले. प्रसिद्धी, पैसा आणि पुरस्कार यासाठी ही धडपड नव्हतीच. समोर होती ती भूमी… निसर्ग! निसर्ग जगवतो त्याच्याप्रतीची कृतज्ञता, धडपड, तळमळ. कष्ट त्याचसाठी होते.

काही वर्षांपूर्वी वि. द. घाटे लिखित ‘आऊ’ हे कर्नाटकाच्या एका दुर्गम भागातील महिलेचे व्यक्तिचित्रण वाचनात आले होते. या लेखात वर्णन केलेली आऊ जख्खड म्हातारी होती. सर्वांगावर सुरकुत्या पडलेल्या. केसांच्या अंबाड्या झालेली, सडसडीत डोळ्यांत तेज होते. गावात मास्तर शाळा तपासणी करण्यासाठी आले असता ती त्यांच्या मागेच लागते की माझं घर बघण्यासाठी या! गुरुजी तिच्या आग्रहास्तव तिच्याकडे येतात आणि थक्क होऊन जातात. त्या छोट्याशा शेणाने सारवलेल्या घरात चक्क पुस्तकांचे कपाट होते. तू शिकलीस का गं आऊ? या प्रश्नावर ती थोडी लाजते. ती लाज तिला वाटत होती कारण ती शिकलेली नव्हती म्हणून. तिची मुलगी शिक्षिका. तिच्याकडून आऊने धडे गिरवून घेतले.

अक्षरे गिरविण्याच्या ध्यासाने आऊ एवढी झपाटली की बोटाने मातीत, भांडी घासताना अक्षरे गिरवू लागली. एवढेच नाही तर चक्क रात्रीच्या वेळी मुलीच्या- ती झोपेत असताना- तळपायावर अक्षरं गिरविण्याचा सराव करू लागली. पायाला गुदगुल्या व्हायच्या. मुलगी जागी व्हायची. मग आऊ ओशाळायची. मुलाप्रमाणे आऊचे तिच्या सुमन नावाच्या म्हशीवर प्रेम होते.

गुरुजी आऊचे असे व्यक्तिमत्त्व पाहून आश्चर्यचकित होतात. ते तिला विचारतात, आऊ देवधर्म करायच्या वयात तू पुस्तकं काय घेऊन बसलीस? त्यावर आऊ ताडकन स्वतःच्या गालावर चापट मारून म्हणते, छे बा! त्या भानगडीत मला नाही पडायचं. या बुवाबाजीच्या मागे लागून आमच्या बायका बिघडल्या की काय, तर म्हणे एक त्याच्या पाठीला तेल, तर दुसरी पायाला लावते. आणखी एखादी आंघोळ घालते. मला हे अजिबात आवडत नाही. मी त्यांना ठणकावून सांगते, बुवांच्या नादी लागू नका. तुमच्या लेकी-सुनांना लिहायला-वाचायला शिकवा. आऊंचे हे तत्त्वज्ञान ऐकून थक्क व्हायला होते. विचारांची परिपक्वता ही झकपक पोशाखात, उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्वात अनुभवता येते असे अजिबात नाही याची प्रचिती इथे येते.

अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या शिकल्या नाहीत, पण तथाकथित शिक्षित समजणार्‍यांपेक्षा कितीतरी पटीने त्यांची वैचारिक प्रगल्भता दृष्टीस पडते. चिपको आंदोलनातील गौरा देवी असो किंवा गावागावांत घर, कुटुंब, संसार सांभाळून धैर्याने जगण्याची वाटचाल करणार्‍या असंख्य स्त्रिया; काळाच्या ओघात बराच बदल झाला. मागे वळून पाहताना महिलांच्या इतिहासात डोकावून पाहिले असता त्यांचा जीवनप्रवास सरळ रेषेत कधीच झाला नाही. याला कारण इथली संस्कृती, समाज, भौगोलिक रचना वगैरेत दिसते. रूढी-परंपरांच्या अगणित धाग्यात ते गुंतले गेले आहे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना कन्या, पत्नी आणि माता या भूमिकेतच प्राधान्यक्रम दिला गेला आहे. त्यातही माता-पत्नीची कर्तव्य कोणती आहेत याविषयीची नियमावली परंपरेने घालून दिलेली आहे. त्यांचे पालन काटेकोरपणे करणारी ती आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी! महिलांनी स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनून कलेची उपासना करावी, ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरावा, आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाय रोवावेत, उपजत कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी झटावे, असे तिच्याबाबतीत कोणीच कधीही विचारात घेतले नाही. असे असले तरी वेदकालीन स्त्रिया मध्ययुगीन स्त्रियांपेक्षा खूपच वेगळ्या, हुशार, स्पष्टवक्त्या होत्या.

वादविवादात सहभागी होणे, प्रश्न उपस्थित करून त्याचे समाधानकारक उत्तर सापडेपर्यंत अस्वस्थ राहणे… ज्ञानप्राप्तीसाठी ऐहिक सुखाचा त्याग करणे, प्रसंगी दागिने- धनदौलत यांपेक्षाही आत्मज्ञानाचा शोध त्यांना महत्त्वाचा वाटत होता. गार्गी, मैत्रेयी, अपाला या काही विदुषी स्त्रियांची नावे कायम स्मरणात राहणारी आहेत. सीता, द्रौपदी यांचा एक वेगळा आदर्श समाजमनावर आजही आहे. सीतेने सोशिक, संयत होत चिरकालीन समाधी घेतली, तर द्रौपदीने प्रचंड संघर्ष केला. पुढे मग यात असंख्य नावांची भर पडत गेली. राणी लक्ष्मीबाई, संत स्त्रिया, समाजसेवेचे व्रत स्वीकारून वाटचाल करणार्‍या स्त्रिया. १९ ते २१ साव्या शतकात प्रचंड वेगाने सर्वच क्षेत्रांत बदल झाला. परंतु चांगली स्त्री ही सोशिक, गोड, मृदू बोलणारी, सर्वांची काळजी घेणारी, त्यागमूर्ती, सेवावृत्तीची असायला हवी अशी संकल्पना आजही मूळ धरून आहे. संसारात स्वतःला गुंतवून न घेणारी स्त्री समाजाला पसंत नाही.

एखाद्या महिलेला प्रश्‍न विचारला की तू काय करतेस? तर ‘घरातच असते’ असे तिचे उत्तर असते. एका बाजूला घर, संसाराला प्राधान्य देणारी स्त्री समाज सहजपणे स्वीकारतो, तर दुसर्‍या बाजूने तिने आपल्या कुटुंबासाठी केलेले समर्पण आठवणीत ठेवले जात नाही. आजपर्यंत स्त्रियांनी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपल्या कल्पकतेने समाजात विविध स्तरांवर योगदान दिलेले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात वर उल्लेखिलेल्या स्त्रियांची नाममुद्रा अमीट अशीच आहे. अलीकडच्या काळातील मेधा पाटकर यांचा धरणग्रस्तांसाठीचा संघर्ष, नर्मदा बचाव आंदोलन यांमधून तिची झेप, तिची विचारधारा स्पष्ट होत जाते. पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनासाठी कृती-लेखणीतून झटणार्‍या वंदना, शिवा अशी अनेक नावे आहेत. संशोधक सांगतात, स्त्रियांची निरीक्षणशक्ती अतिशय विश्वासाहार्य असते.

अलीकडच्या काळात स्त्रियांचा बराच वेळ मुलांच्या संगोपनासाठी जातो. मुलाला जन्म देण्यापासून ते त्याला वाढविण्यापर्यंत त्यांचा बराच वेळ खर्ची पडतो. कुठलीही चांगली माता हे काम न कंटाळता करीत असते. ज्या प्राण्यांना बोलता येत नाही अशांचे निरीक्षण करणे स्त्रियांना जमते. काही करण्यासाठी धीर धरणे, सोशिक असणे आणि एखाद्या कामात गुंतवून घेतले की ते शेवटपर्यंत तडीस नेणे हे स्त्रियांना बरे जमते. न कंटाळता, न थकता, उतावीळ न होता तासन्‌तास त्या आपल्या कार्यात व्यग्र राहू शकतात. डॉ आनंदी गोपाळ जोशी, सावित्रीबाई फुले ही नावे महत्त्वाची आहेत. वेद, पुराण, इतिहास असा कालखंड नजरेसमोर आणला तर कितीतरी स्त्रिया या त्यांच्या उत्तुंग व्यक्तित्वासकट आठवतात. भारतीय संस्कृतीत संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याचे काम स्त्रिया करतात. किंबहुना तोच गाभा मानला जातो. निर्माण कार्य, जोपासना व पोषणकार्य हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र मानले जाते. त्याला अनुसरून ती शेकडो वर्षांपासून काम करीत आलेली आहे. तिचं समर्पण हे समाज, कुटुंबासाठी मोठं योगदान आहे. परंतु त्याचं योग्य मूल्य लक्षात घेतलं जात नाही. स्त्री शिकली-सवरली तरी तिचा संघर्ष संपलेला नाही.

शिक्षणाने तिला ज्ञानाची असंख्ये कवाडे उघडी मिळाली. आत्मशक्तीच्या जोरावर तिने स्वतःचे सर्वोच्च स्थान निर्माण केले. असे असतानाही ती अलीकडे आत्मकेंद्रित होते आहे का? हा प्रश्‍न मनाला पडतो. तुलसी गौडा, राहीबाई यांसारख्या अक्षर ओळख नसलेल्या स्त्रिया शिक्षित समाजासाठी केवढा मोठा आदर्श निर्माण करतात. झाडांच्या सोबतीने वाढलेली तुलसी तीस हजार झाडे लावते. एवढेच नाही तर झाडे ती जगवतेसुद्धा! पोटच्या पोरावर प्रेम करावे तसा तिने झाडांना जीव लावला. राजस्थानच्या अमृतादेवीने वृक्ष वाचविण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या मुलींनीही आपल्या आईचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून खेजडी वृक्षतोड थांबविण्यासाठी आत्मबलिदान केले. शेकडो गावकरी या लढाईत स्वप्रेरणेने सामील झाले. कृती दिखाऊपणासाठी नव्हती तर आतून त्यांना निसर्ग, प्राण्यांविषयी प्रेम होतं म्हणून हे झालं.

आजची स्त्री शिकलेली, उच्च पदावर नोकरी करणारी आहे. घर, कुटुंब आणि कार्यालय ती लीलया सांभाळते. मुलांनाही ती काहीच कमी पडू देत नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या युगात ती जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करून आहे. असे असतानाही ती अस्वस्थ वाटते. आर्थिक स्थैर्य, तिच्या प्रतिष्ठितपणाच्या संकल्पना स्पष्टपणे अधोरेखित होत नाहीत. पूर्वी एकत्र कुटुंबात तिला उसंत नव्हती. पुरुष बाहेरची कामे तर स्त्रिया घरात व्यस्त असत. शेती-शिवाराची कामेसुद्धा तीच करायची. डोंगरावरून जळणासाठीची लाकडे आणण्यापासून सगळीच कष्टाची कामे तिचीच असायची. तिचं निसर्गज्ञान अफाट होतं. औषधी वनस्पतींचा तर खजिनाच तिला गवसलेला होता. तिची कलात्मकता तिनं काढलेल्या रांगोळी, मेंदीतून अनुभवता यायची. शेणाने सारविलेल्या जागा, विविध प्रकारची अंगणाच्या कडेकुशीची फुलझाडे तिच्याच आत्मीयतेने सजायची. कापडापासूनची गोधडी, वीणकाम, भरतकाम, कपडे शिवण्यापासून ते वैविध्यपूर्ण प्रकारचे पदार्थ करण्यात तिचा हातखंडा होता. इतकं सगळं करतानाही तिनं आपल्या अंतःकरणातील काव्य जतन करून ठेवलं होते.

लोकगीते, लोकनृत्याच्या अभिव्यक्तीतून तिच्यातली कलाकारी व्यक्त होत गेली.
आज तिचा प्रवास अनंत दिशांनी होत आहे. तिच्या जगण्याचा प्रवाह विस्तारला जात आहे. ती अधिकाधिक व्यस्त होत आहे. अशा पार्श्वभूमीवर जगणं आणि सभोवतालाकडे सजगतेने बघणं तिच्यासाठी अनिवार्य आहे. शिक्षण, नोकरी ही फक्त भौतिक सुखं विकत घेण्यासाठी नसून त्याचा वापर थोडातरी समाजाच्या उत्कर्षासाठी व्हायला हवा. समस्या असंख्य आहेत. त्या वाढविण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्याचे भान बाळगायला हवे. मुलांना वाढवताना, कुटुंब सावरताना डोळस होणं गरजेचं आहे. नवविचारांची जोड कृतिशीलतेला देऊन समाज, संस्कृती, निसर्गाप्रतीचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायला हवा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य, आहार, आरोग्य, शिक्षण यांकडे लक्ष देऊन निकोप समाज घडविण्यासाठी स्त्रियांनी तत्पर असायला हवे! खरे ज्ञान कधी लिंगभेद मानीत नाही. गरज आहे साचलेपणाला आव्हान देणार्‍या विचारांची! निश्चय आणि धैर्याच्या सोबतीने नवनव्या क्षितिजापर्यंत स्वतःला विस्तारत नेता येते याची असंख्य उदाहरणे आहेत. विचारातील सकारात्मक नावीन्य ही खरी नव्या सहस्रकातील आपली ओळख आहे. याची जाणीव जेव्हा तीव्रतेने होईल तोच खरा महिलादिन..!!