- – शांता लागू
शिक्षण, अर्थार्जन आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या बाबतीत स्त्रीला बर्याच अंशी सर्व मिळत चालले आहे. पारंपरिक बेड्यांतून स्त्रीची बर्याच अंशी सुटका झाली आहे. बर्याच प्रमाणात प्रगती झाली आहे. आज सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. आता स्त्री अबला राहिलेली नाही; तिला सबलाच म्हटले पाहिजे!
महिलादिन साजरा होण्यामागे जगातील महिलांचा मोठा इतिहास आहे. ८ मार्च १९०८ साली न्यूयॉर्कमध्ये झेटकिन नावाच्या समाजवादी कार्यकर्तीने वस्त्रोद्योगातील कामगार स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र करून रुटगर्स चौकात निदर्शने केली. कामगार स्त्रियांना जागरूक करणे हे काम तिला करायचे होते. कारखान्यातील महिलांसंबंधी काही मागण्या होत्या. त्यामुळे यांनी मोठी निदर्शने केली. या मागणीबरोबरच स्त्रियांनी जागृत होण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर महिलांना मतदानाचासुद्धा हक्क नाही हे लक्षात आल्यावर जगभरातून अनेक ठिकाणी मतदानाच्या हक्कासाठी अशीच निदर्शने झाली. स्त्रियांनी एकजुटीने मतदानाचा हक्क मिळवला.
तसेच लिंग, वर्ण, शैक्षणिक पार्श्वभूमी, मालमत्तानिरपेक्ष असा मतदानाचा अधिकार प्रौढ स्त्री-पुरुषांना मिळायला हवा यासाठी ही निदर्शने परिणामकारक ठरली. या निदर्शनांची आठवण आणि स्त्री स्वातंत्र्याचे एक पुढचे पाऊल, स्त्रीच्या प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणून ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात स्त्रियांच्या गौरवार्थ साजरा केला जातो. आपल्याकडे तर स्त्री ‘चूल आणि मूल’ या संस्कृतीत स्वयंपाकघराच्या बाहेर पडत नसे. स्त्रियांवर सामाजिक, कौटुंबिक अशी विविध बंधने होती. त्यामुळे आपली माता, पत्नी, मुलगी, सून कोणत्याही नात्यातून कर्तव्ये पार पाडताना ठरावीक चाकोरीबद्ध जीवन व्यतीत करावे लागे. एवढेच नव्हे तर हक्क, अधिकार हे शब्दच तिच्या शब्दकोशात नव्हते. तिला हक्कांची जाणीव होणार तरी कशी? ती आहे त्या जीवनात समाज सांगेल तसेच जिणे जगत होती…
मग हळूहळू काळ बदलत गेला. काळ म्हणण्यापेक्षा माणूस बदलत गेला. कारण राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे अशी अनेक थोर माणसे पुढे आली. या समाजसुधारकांनी वाईट प्रथा बंद करून समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले. आणि स्त्री-शिक्षणाचा खर्या अर्थाने श्रीगणेशा झाला असे म्हणता येईल.
यानंतरच स्वयंपाकघराच्या उंबर्याआत असणारी स्त्री हळूहळू उंबर्याबाहेर येऊन नंतर ती सामाजिक, कौटुंबिक बेड्यांतून मुक्त होऊन शिक्षणासाठी दिंडी दरवाजाच्या मोठ्या उंबर्याच्यासुद्धा बाहेर पडू लागली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या इतरही धुरिणांनी अथक परिश्रम घेतले. आधार दिला. बालविवाह थांबविले. पुनर्विवाहाचे महत्त्व समाजाला सोदाहरण पटवून दिले.
स्त्री अशीच पुढे जात राहिली. नंतर कुटुंबाची, स्वत:ची गरज म्हणून शिक्षणानुसार कमावती झाली. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडलेली बालिका मोठी होऊन नंतर अर्थार्जन व अर्थव्यवहार सांभाळू लागली. तिचे सबलीकरण हळूहळू सिद्ध झाले. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला कधी पूर्वी अधिकार दिलेच नव्हते.
तसे पाहिले तर काळ इथवर येऊन ठेपला. शिक्षण, अर्थार्जन आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या बाबतीत बर्याच अंशी स्त्रीला सर्व मिळत चालले आहे. सामाजिक पारंपरिक बेड्यांतून महिलांची बरीचशी सुटका झाली आहे. बर्याच प्रमाणात प्रगती झाली आहे, यात मुळीच शंका नाही. सुधारकांच्या प्रयत्नांना यात यश आले आहे ते गौरवास्पद आहेच. आज सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. आता स्त्री अबला राहिलेली नाही; तिला सबलाच म्हटले पाहिजे!
मात्र… तिच्यावर, तिच्या कर्तृत्वावर विश्वास टाकायला हवा. घरातून आई-वडील व इतर कुटुंबीयांनी लहानपणापासूनच तिच्यातील आत्मविश्वास वाढवायला हवा. तसेच मुलग्यांना बहिणीकडे, आईकडे, बायकोकडे आणि परस्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नितळ, स्वच्छ आणि सन्मानदायी ठेवण्याची शिकवण देण्याचे कार्य घरातून, शाळांमधून व्हायला हवे, तरच ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता:’ ही उक्ती सार्थ होईल.
आता अजून तिला काय काय हवे आहे? आता कसली खंत?? असे वाटले तरी जोपर्यंत सुरक्षित जीवन पूर्णपणे मिळत नाही, घरी, दारी, रानात, रस्त्यात, वाहनांमध्ये तिच्यावर होणारे अत्याचार थांबत नाहीत तोवर शिक्षणाचे आणि इतर स्वातंत्र्याचे, सर्व क्षेत्रांत झालेल्या तिच्या प्रगतीचे पंख कापल्यासारखेच असणार. अत्याचार झाल्यानंतर नुसते मेणबत्त्या पेटवून, मूकमोर्चे काढण्यापेक्षा खरं तर अशी वेळच तिच्यावर येऊ देऊ नये. तिच्यावरचे पाशवी अत्याचार थांबल्याचे आशादायी चित्र अजून तरी आपल्याला देशात दिसत नाही.
म्हणून तेथे अगदी देवी म्हणून वागवण्याची अपेक्षाच नाही. स्त्रीचे स्त्रीत्व फक्त तनातच नाही तर मनातही एकवटलेले असते. स्त्री केवळ सृजनाचे यंत्र नाही. मन, बुद्धी असलेला तो एक हाडामांसाचा जीव आहे. कवयित्री पद्मा गोळे म्हणतात- ‘मी माणूस माणूस आधी…’ त्यामुळे मी माणूस, माणूस आधी हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे.
स्त्री ही प्रथम एक माणूस आहे. तिला घरात आणि शाळेत तसेच शिक्षण मिळायला हवे, तरच महिलादिनाच्या गौरवाचे सार्थक होईल.