प्रभाग फेररचनेबाबत ९१३ हरकती ग्रामस्थांकडून सादर

0
12

>> उत्तर गोव्यातून सर्वाधिक सूचना

राज्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग फेररचना मसुद्याबाबत ग्रामस्थांकडून एकूण ९१३ सूचना, सुधारणा व हरकती सादर करण्यात आल्या आहेत. त्यासाठीची मुदत काल संपुष्टात आली.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना मसुदा तयार करून सूचना व हरकतींसाठी ४ मार्चपर्यंत खुला केला होता. तालुका मामलेदार आणि तलाठी कार्यालयात ग्रामपंचायत प्रभाग फेररचनेचा कच्चा मसुदा नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर प्रभाग फेररचनेबाबत अनेकांनी सूचना, दुरुस्त्या, हरकती सादर केल्या.

उत्तर गोव्यातील पंचायतींमधून सर्वाधिक ६५० सूचना व हरकती सादर करण्यात आल्या आहेत, तर दक्षिण गोव्यातील पंचायतींमधून २६३ सूचना व हरकती संबंधित निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आल्या आहेत.
उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील पंचायतींमधून सर्वाधिक ३९८ सूचना, दुरुस्त्या सादर करण्यात आल्या आहेत. तिसवाडी तालुक्यातून १२७, पेडणे तालुक्यातून ८८, डिचोली तालुक्यातून २३ आणि सत्तरी तालुक्यातून १४ सूचना व हरकती सादर करण्यात आल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ९८ सूचना, हरकती सादर करण्यात आल्या आहेत. फोंडा तालुक्यातून ६५, मुरगाव तालुक्यातून ४०, केपे तालुक्यातून २६, काणकोण तालुक्यातून १७, सांगे तालुक्यातून ९ आणि धारबांदोडा तालुक्यातून ८ सूचना व हरकती सादर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कॉंग्रेसने सूचना व हरकतींसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती; मात्र राज्य निवडणूक आयोगाने सूचना, हरकतीसाठी मुदतवाढ दिलेली नाही.