युक्रेनमधून आतापर्यंत ६४०० भारतीय परतले

0
19

>> परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांची माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील भारतीयांच्या स्थितीबाबत काल माहिती दिली. भारताने पहिली मार्गदर्शक सूचना जारी केल्यापासून आतापर्यंत १८००० भारतीयांनी युक्रेन सोडले आहे, तर ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत ३० विमानांद्वारे युक्रेनमधून ६,४०० नागरिकांना मायदेशात आणण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल सांगितले.

गेल्या २४ तासांत १५ विमाने भारतात आली आहेत. पुढील २४ तासांत १८ उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत. यापैकी ३ उड्डाणे भारतीय हवाई दलाची सी-१७ उड्डाणे आहेत. एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, गोएअर आणि गोफर्स्ट फ्लाइट्ससह उर्वरित व्यावसायिक उड्डाणे आहेत. युक्रेनमधून बाहेर पडलेले शेकडो नागरिक शेजारच्या देशांमध्ये आहेत. या सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशात परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे बागची म्हणाले.

भारत सरकारने युक्रेनमधून हजारो नागरिकांना बाहेर काढले असेल; पण तरीही मोठ्या संख्येने नागरिक युक्रेनमध्ये अजूनही अडकलेले आहेत. सुरुवातीला २०,००० भारतीय नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती; पण नोंदणी न केलेल्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. काहीशे नागरिक अजूनही युक्रेनच्या खारकीव्हमध्ये अडकल्याचा आमचा अंदाज आहे. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला जो मार्ग सोयीचा वाटेल, आम्ही तिथे जाऊ, त्यांना बाहेर काढू, असा विश्वास बागची यांनी नागरिकांना दिला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी युक्रेनमधून मायदेशात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांशी वाराणसीत संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले अनुभव सांगितले. हे विद्यार्थी वाराणसीसह उत्तर प्रदेशच्या इतर भागातील होते.

चेर्निहाइव्हमधील २२ नागरिक ठार

युक्रेनच्या उत्तरेकडील २ लाख ८०,००० लोकसंख्या असलेल्या चेर्निहाइव्ह शहरातील निवासी भागावर काल रशियाने हल्ला केला या हल्ल्यात जवळपास २२ नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान, युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.