दोन गोमंतकीय विद्यार्थिनी मायभूमीत दाखल

0
29

>> युक्रेनमधून आतापर्यंत १९ पैकी ८ विद्यार्थी गोव्यात पोहोचले सुखरुप

युक्रेनमधून काल आणखी दोन विद्यार्थिनी सुखरूपपणे गोव्यात दाखल झाल्या. बोर्डा-मडगाव येथील एनेझ्का फर्नांडिस ही विद्यार्थिनी नवी दिल्ली येथे गुरुवारी दाखल झाली. त्याच दिवशी ती संध्याकाळी गोव्यात परतली. तसेच फोंडा येथील कॅरेन फर्नांडिस ही विद्यार्थिनी बुधवारी उशिरा नवी दिल्ली येथे दाखल झाली होती, ती देखील काल काल गोव्यात परतली. तसेच ताळगावातील एक विद्यार्थी युक्रेनमधून काल नवी दिल्लीत पोहोचला आहे.

नवी दिल्ली येथे गोवा सदनाच्या अधिकार्‍यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी कॅरेन फर्नांडिस हिची फोंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन तिचे स्वागत केले.

युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे आपण तीन दिवस बंकरमध्ये लपून बसले होते. सुमारे ८ किलोमीटर चालत रोमानिया सीमेवर पोहोचले. रोमानिया येथून विमानाने नवी दिल्ली गाठली, असे एनेझ्का फर्नांडिस हिने सांगितले.
युक्रेनमधून रुपल गोसावी ही विद्यार्थिनी सर्वप्रथम गोव्यात दाखल झाली होती. त्यानंतर आत्तापर्यंत सात विद्यार्थी गोव्यात परतले आहेत. युक्रेनमध्ये गोव्यातील एकूण १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी ८ विद्यार्थी गोव्यात परतले आहेत. युक्रेनमधील इतर गोमंतकीय विद्यार्थी मायदेशी परत येण्यासाठी वाटेत आहेत, अशी माहिती अनिवासी भारतीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. दक्षिण गोव्यातील दोन विद्यार्थी रोमानियातून मायदेशी परत येण्यासाठी विमानात बसले आहेत. कुडतरी येथील एक विद्यार्थी पोलंडला पोहोचला आहे. चार विद्यार्थी हंगेरीला पोहोचले आहेत, अशी माहिती आयुक्तालयातून देण्यात आली.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा रशियामधून येणार्‍या चार्टर विमानसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी काल दिली. रशियातून गुरुवारी सकाळी ५०० प्रवाशांना घेऊन एक चार्टर विमान दाखल झाले. रशियातून येणारी चार्टर विमानसेवा अजूनपर्यंत सुरळीतपणे सुरू आहे. देशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे, असेही संचालक मलिक यांनी सांगितले.