>> युद्धानंतर मायभूमी गोव्यात परतणारी पहिलीच गोमंतकीय विद्यार्थिनी; अन्य विद्यार्थ्यांनाही परत आणण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये गोमंतकीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवण्यात येत आहेत. या मोहिमेंतर्गत युक्रेनमध्ये शिक्षण घेणारी गोमंतकीय विद्यार्थिनी रुपल गोसावी ही काल नवी दिल्लीत सुखरूप पोहोचली. त्यानंतर काल रात्री उशिरा गोवा विमानतळावर तिचे आगमन झाले. यावेळी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी तिचे स्वागत केले. युद्ध सुरू झाल्यानंतर मायभूमी गोव्यात परतणारी ती पहिली गोमंतकीय विद्यार्थिनी ठरली.
काल नवी दिल्ली विमानतळावर अन्य भारतीय विद्यार्थ्यांबरोबर रुपल गोसावी हिचे आगमन झाले. त्यावेळी गोवा सदनचे निवासी उपायुक्त विकास कांबळे यांनी तिचे स्वागत केले.
यावेळी कांबळे यांनी रुपल हिची, तसेच तिच्याकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थी-विद्यार्थिनींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
दाबोळी विमानतळावर रात्री आगमन झाल्यानंतर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी रुपल गोसावी हिच्याकडे युक्रेन येथे अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेतली. युक्रेनमध्ये शिक्षणानिमित १२ गोमंतकीय विद्यार्थी अडकून पडले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
तसेच तीन गोमंतकीय विद्यार्थिनी व एक विद्यार्थी अशा आणखी चार गोमंतकीयांचे काल युक्रेनहून रोमानिया येथे सुखरुप आगमन झाले आहे. हे चारही जण रोमानिया येथून विमान पकडून भारतात परतणार आहेत, अशी माहिती अनिवासी भारतीय कक्षाचे नोडल अधिकारी अँथनी डिसोझा यांनी काल माहिती देताना सांगितले.
त्याशिवाय आणखी चार गोमंतकीय विद्यार्थिनी हंगेरी येथील बचाव छावणीमध्ये सुखरूप पोहोचल्या आहेत. त्यांचीही लवकरच भारतात सुखरुप परतण्यासाठीची व्यवस्था केली जाणार असल्याचे अँथनी डिसोझा यांनी स्पष्ट केले.
गोमंतकीय विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या सर्व हालचालींवर आपण देखरेख ठेवून आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या सूचना आपण दिल्लीतील अधिकार्यांना दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था दिल्लीतील ‘गोवा सदन’मध्ये करण्याची सूचना केली आहे. तसेच ते लगेचच गोव्यात परतू इच्छित असल्यास विमानाद्वारे त्यांना गोव्यात पाठवण्याची देखील सूचना केली आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.