युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी काल युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले. त्यांनी दिलेल्या भावनिक भाषणानंतर युरोपियन संसदेतल्या सर्व सदस्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले. झेलेन्स्की यांचे भाषण संपल्यानंतर तब्बल मिनिटभर टाळ्या थांबल्याच नाहीत. झेलेन्स्की यांनी यावेळी आवेशपूर्ण भाषण करत युरोपियन संसदेतल्या सगळ्यांनाच प्रभावित केले. आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरे बंद झाली आहेत. पण तरी देखील कुणीही आम्हाला तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत. आम्ही युक्रेनचे नागरिक आहोत, असे ते म्हणाले.