>> बेलारूसमधील बैठकीत युक्रेनची रशियासमोर मागणी
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रशियन अधिकार्यांनी युक्रेनच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर काल सोमवारी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसच्या गोमेल शहरात रशिया आणि युक्रेनच्या अधिकार्यांमध्ये महत्वाची बैठक झाली. ही बैठक सुमारे साडेतीन तास झाली. मात्र या बैठकीनंतरही रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच या बैठकीत रशियासमोर युक्रेनने क्रिमिया आणि डोनबाससह संपूर्ण देशातून आपले सैन्य मागे घेण्याची मागणी केली आहे.
रशियाला हवाई हद्द बंद
युक्रेनवर हल्ला केल्याप्रकरणी तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेताना रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियनने याबद्दलची घोषणा केली. संघटनेच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनी याबद्दलची माहिती दिली. रशियाची विमाने, रशियात नोंद झालेली विमाने आणि रशियाचे नियंत्रण असलेल्या विमानांचा यात समावेश आहे. युरोपियन युनियनसोबतच कॅनडानेही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.
आण्विक हल्ल्याचा सराव
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा धोका पाहता रविवारी आण्विक हल्ल्याचा सराव सुरू केला असल्याचा दावा रशियाच्या मीडियाने केला आहे. त्यामुळे आता आण्विक हल्ल्याचे संकट उभे राहिले आहे.
सैनिक गमावल्याची कबुली
रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनच्या सैेन्याकडून कडवा प्रतिकार सुरू झाला आहे. युक्रेनने ४३०० रशियन सैन्य मारल्याचा दावा केला आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात ११६ मुलांसह १६८४ नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. मात्र जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आता पहिल्यांदाच रशियाने आपले काही सैनिक या युद्धात बळी गेले असल्याचे कबुल केले आहे.
विद्यार्थ्यांचे हाल
युक्रेनमध्ये सुमारे १६ हजार भारतीय अडकले आहेत. त्यात विद्यार्थीही आहेत. त्यांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना भारत सरकारने आखली आहे. भारतातून मागच्या वर्षी वैद्यकीय अभ्यासासाठी युक्रेनमध्ये गेलेले दोन विद्यार्थी युद्धाच्या संकटामुळे ३ अंश सेल्सियस इतक्या तपमानात युक्रेनची राजधानी किव्हहून तब्बल २८ किमी अंतर रात्रभर चालत पार करून पोलंड सीमेवर पोहोचले आहेत. असे अनेक भारतीय जमेल तसे पोलंडमार्गे भारतात परतण्यास मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत.
युक्रेनमधून ११०० भारतीय मायदेशी
भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्यांतील २४९ भारतीयांना घेऊन पाचवे विमान काल सोमवारी सकाळी भारतात दाखल झाले. आतापर्यंत ११०० हून अधिक भारतीय युक्रेनमधून मायदेशात आले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानियातील बुखारेस्टमधून विमानाने आणण्यात आले. २४९ भारतीय एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत दाखल झाले.