मास्कमुक्तीच्या दिशेने?

0
30

जगातील अनेक देशांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथील करण्यास सुरूवात केलेली आहे. ज्या देशांची सरकारने त्याला राजी नाहीत, त्यांनाही तेथील जनतेने उग्र निदर्शने करून नमविल्याचीही उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात गेली दोन वर्षे आपण आपल्या तोंडावर ज्या मुखपटट्या घालून फिरतो आहोत, त्यापासून मुक्ती मिळवण्याच्या टप्प्यावर आपण येऊन ठेपलो आहोत का याचा विचार करायला हरकत नसावी.
अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना ही आता महामारी राहिलेली नाही, तर पँडेमिक ऐवजी तो एंडेमिक बनलेला आहे अशी भूमिका तेथील सरकारांनी घेतली आणि निर्बंध हटवायला सुरूवात केली आहे. डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे अशा युरोपीय देशांनी जानेवारी अखेरीस एकीकडे ओमिक्रॉनची लाट उसळलेली असतानाच आपल्या देशातील सर्व निर्बंध उठविले होते. ब्रिटननेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मागे घेतली आहे. इटली आणि स्पेननेही ब्रिटनच्या पावलावर पाऊल टाकत मास्कसक्ती मागे घेतली आहे. केवळ बंदिस्त जागेमध्येच मास्क वापरले जावेत. बाहेर खुल्या जागेमध्ये मास्क वापरण्याची आता आवश्यकता नाही अशी भूमिका त्या देशांच्या सरकारांनी घेतली आहे. फक्त ते आणि आपण यात एक मोठा फरक आहे. आपण लोकसंख्याबहुल देश आहोत. आपल्यासारखी सार्वजनिक ठिकाणची अतोनात गर्दी आणि गजबजाट या युरोपीय देशांमध्ये सहसा पाहायला दिसत नाही. त्यामुळे तेथे मास्कविना सामाजिक अंतर आपोआप राखले जाऊ शकते, तसे आपल्याकडे होणे असंभव आहे. तरीही आपल्या देशातही आसाम, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांनी केवळ तोंडावरचा मास्क सोडल्यास सर्व प्रकारचे निर्बंध हटविलेले आहेत. महाराष्ट्र सरकारही त्याबाबत विचार करीत आहे. शाळा तर ऑफलाइन पद्धतीने सर्वत्र सुरू झालेल्या आहेत. एकेक करून कोरोनाचे निर्बंध कमी होत चालले आहेत. परंतु सर्वच्या सर्व निर्बंध हटविणे सध्याच्या परिस्थितीत योग्य व हितकारक ठरेल का, याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करून आपली भूमिका मांडावी लागेल.
केवळ जनतेच्या दबावाखातर किंवा आर्थिक दबावांखातर हे निर्बंध हटविणे धोक्याचे ठरू शकते. वैद्यकीय तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे, खरोखरच कोरोना महामारीपासून, सध्याच्या तिच्या तिसर्‍या लाटेपासून आपण मुक्त झालो आहोत का याचा विचार करून सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे.
गोव्यापुरता विचार करायचा झाला तर गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी झालेली दिसते. मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र सध्या तरी सरकारच्या आकडेवारीवरून निर्माण झालेले आहे. अर्थात, यामध्ये सातत्य राहते की नाही हे पाहण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल. तिसर्‍या लाटेचे शिखर येऊन गेले आहे हे तर स्पष्टच आहे, परंतु ती पूर्णांशाने ओसरली आहे का हे अजून स्पष्ट नाही.
ज्या देशामध्ये कोरोनाची सुरवात झाली त्या चीनमध्ये तर अजूनही सर्व कडक निर्बंध कायम आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या, संपर्कशोध, आत आणि बाहेर मास्क वापरणे हे सगळे निर्बंध चीनने कायम ठेवलेले आहेत.
भारतात मास्क वापरण्याची अजूनही सक्ती आहे, परंतु तिचे पालन मात्र आता पूर्वी इतक्या गांभीर्याने होताना दिसत नाही. जर सक्ती असेल तर तिची कार्यवाही व्हायला हवी आणि जर नसेल तर निर्बंध अधिकृतरीत्या हटविले जायला हवेत. धड सक्तीही नाही आणि धड मुक्तीही नाही अशा धेडगुजरी वातावरणात कोणीही सुखाने श्वास घेऊ शकणार नाही, कारण आपण मास्क वापरला तरी समोरचा वापरील याची शाश्‍वती नसते.
जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोरोनाबाबत सावधगिरीचीच भूमिका घेतलेली दिसते. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग कायमचे राहणार नाही. कधीतरी ते संपुष्टात येणारच आहे. परंतु ती वेळ अद्याप आलेली आहे की नाही याबाबत तज्ज्ञांमध्येच मतभेद आणि त्यामुळे संदिग्धता आहे. ओमिक्रॉन हा काही कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नव्हे असेही जागतिक आरोग्य संघटना सांगत असल्याने आणि जगात कुठे कुठे त्याहून वेगळ्या व्हेरियंटची काही तुरळक उदाहरणे आढळून आल्यामुळे या संभ्रमात भरच पडली आहे. ही महामारी संपुष्टात येण्याची प्रतीक्षा संपूर्ण जग करते आहे. आजवरच्या महामार्‍यांप्रमाणेच कोरोनाची महामारीही संपुष्टात येणारच आहे, परंतु थोडा संयम गरजेचा आहेे, कारण कोरोना पसरतो तेव्हा कसा वणव्यासारखा पसरत असतो. त्यामुळे त्याचे निर्बंध हटवताना ते विचारपूर्वकच हटवावे लागतील. तेेथे घिसाडघाई मुळीच उपयोगाची नाही.