शहाळ्याच्या पाण्यासाठी माघारी फिरला; अन् सरपंचाच्या पतीने जीव गमावला

0
19

दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर गावच्या सरपंच स्नेहा गवस यांचे पती संजय गवस (४५) यांचा काल जुने गोवे येथे अंगावर माड पडून अपघाती मृत्यू झाला. वेळ निभावली होती; पण काळ आला होता, असा काही दुर्दैवी प्रकार त्यांच्याबाबतीत घडला. जुने गोवे येथून दुचाकीवरून दुपारी कामावर जात असताना संजय गवस हे शहाळ्याचे पाणी पिण्यासाठी माघारी फिरले अन् काळाने त्यांना गाठले.

मिळालेल्या माहितीनुसार, झरेबांबर येथील संजय गवस हे गोवा येथे सिप्ला कंपनीत कामाला होते. शुक्रवारी दुपारी जेवण करून ते दुचाकीवरून कामावर जात असताना जुने गोवेतील पुरातत्व विभागाच्या कार्यालयानजीक असलेला एक मोठा माड मधोमध तुटून सरळ त्यांच्यावर पडला.

जुने गोवे येथे ज्या ठिकाणी हा माड होता, तो पार करून संजय गवस हे पुढे गेले होते; पण शहाळ्याचे पाणी (नारळाचे पाणी) पिण्यासाठी ते पुन्हा माघारी फिरले.
शहाळ्याचे पाणी पिऊन ते दुचाकीवरून कंपनीत जाणार तोच एक माड मधोमध तुटून त्यांच्यावर पडला आणि त्यांचा मृत्यू झाला. वेळ निभावली होती; पण काळाने त्यांना शहाळ्याचे पाणी पिण्यासाठी पुन्हा माघारी आणले आणि शेवटी डाव साधला.

संजय गवस यांच्या अपघाती निधनामुळे झरेबांबर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ व नातेवाईक असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथे गोमेकॉत ठेवण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर शनिवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.