फोंडा-पणजी महामार्गावरील फर्मागुढी येथील जीव्हीएम महाविद्यालय संकुलासमोरील सर्कलजवळ काल रात्री दुचाकी आणि अवजड ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एका ४७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अर्जुन लक्ष्मीकांत नाईक (रा. म्हार्दोळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीव्हीएम महाविद्यालय संकुलासमोरील सर्कलजवळ काल रात्री ८ च्या सुमारास अवजड ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यात अर्जुन नाईक हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी अनुष्का नाईक (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हे दांपत्य फोंड्यात संध्याकाळी बाजार करून आपल्या एमएच-०७-एए- १६४३ या क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी परतत होते; मात्र वाटेत जीए-०८-व्ही-०६५२ या क्रमांकाच्या अवजड ट्रकची जोरदार धडक दुचाकीला बसली. त्यात दुचाकी ट्रकच्या खाली आल्याने अर्जुन नाईक जागीच ठार झाले. या प्रकरणी ट्रकचालक सागर नाईक (४२, रा. बेळगाव) याला अटक केली आहे.