टपाली मतदानाबाबत चौकशीचे आदेश

0
17

>> मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडून संबंधितांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना

टपालाद्वारे जे सरकारी कर्मचारी मतदान करणार आहेत, त्यांची मते आपणालाच मिळावीत, यासाठी काही उमेदवार व राजकीय नेते सदर मतदारांवर दबाव आणत असल्याच्या ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याची दखल घेऊन काल मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी जिल्हा निर्वाचन अधिकारी, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महासंचालकांना या संदर्भात चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर राज्यात सध्या टपाली मतदानाचा विषय चांगलाच गाजत आहे. टपाली मतदानासाठी सत्ताधारी भाजपकडून सरकारी कर्मचार्‍यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप करत कॉंग्रेसने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला आहे. या संदर्भात कॉंग्रेससह अन्य काही पक्षांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निर्वाचन अधिकारी, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महासंचालकांना याविषयी चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करावा लागणार आहे.

काही पक्षांचे नेते व कार्यकर्ते टपाली मतांसाठी मतदारांना गाठून त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या गैरप्रकारात एखाद्या उमेदवाराशी संबंधित व्यक्ती किंवा स्वत: उमेदवार गुंतला असल्याचे आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा व भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असेही सदर नोटिसीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

जे सरकारी कर्मचारी मतदानाच्या दिवशी ड्युटीवर होते, त्यांच्यासाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आलेली असून, त्यांना येत्या ८ मार्चपर्यंत मत नोंदवून संबंधित निर्वाचन अधिकार्‍यांकडे टपालाने किंवा व्यक्तीश: देण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

…तर कडक कारवाई होणार
मतदानाच्या दिवशी जे सरकारी कर्मचारी ड्युटीवर होते, अशा कर्मचार्‍यांवर टपाली मतदानासाठी जर कुणी दबाव आणत असेल किंवा एखादा मतदार मतासाठी पैसे घेत असल्याचे आढळून आले तर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी काल नोटिसीद्वारे स्पष्ट केले.