>> रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची घोषणा; युद्धाचे ढग अधिक गडद
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून, युक्रेनमधील दोन प्रांताना ‘स्वतंत्र देश’ म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. जनतेला संबोधित करताना काल त्यांनी ही घोषणा केली. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली असून, तणाव आणखी वाढण्याची भीती आहे.
लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून, त्यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या कथित लष्करी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी लष्करी मदतीची तरतूद करणार्या मैत्रीच्या करारांवर स्वाक्षर्या कराव्या, अशी विनंती फुटीरतावादी नेत्यांनी पुतीन यांना केली होती.
पुतीन यांनी जनतेला संबोधित करतानायुक्रेन हा रशियाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, असे सांगितले. तसेच पूर्व युक्रेन ही प्राचीन रशियन भूमी आहे. डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी हा निर्णय फार पूर्वीच घेतला जाणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले.
भारताची भूमिका काय?
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढतच आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे भारताने म्हटले आहे. रशिया-युक्रेन संकट कमी करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, असे मत भारताने युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलने बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत व्यक्त केले आहे.
घाबरत नाही; पाश्चिमात्यदेशांचा पाठिंबा : जेलेंस्की
व्लादिमिर पुतीन यांच्या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला कोणतीही भीती नसून, पाश्चिमात्य देश आपल्याला पूर्ण पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.