पहिली ते सहावीचे विद्यार्थी २ वर्षानंतर शाळेत

0
24

>> मुलांच्या हजेरीने राज्यातील शाळा गजबजल्या; पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच ठेवले शाळेत पाऊल

मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचे संकट उद्भवल्यानंतर गेल्या २ वर्षांपासून राज्यातील पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेत पाऊल ठेवले नव्हते. त्यांनी काल २ वर्षानंतर पहिल्यांदाच शाळेत प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांत पहिलीत प्रवेश घेतलेले आणि यंदा जे विद्यार्थी दुसरीत शिकत आहेत, ते विद्यार्थी अजून शाळेची पायरी देखील चढले नव्हते. त्या विद्यार्थ्यांनी काल पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवले. बहुतांश विद्यालयात या मुलांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणात खूप फरक आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण अंगवळणी पडलेल्या पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शिक्षण घेताना अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने राज्यातील सरकारी, अनुदानित पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विशेष मुलांच्या विद्यालयांचे पहिली ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग पुन्हा भरविण्यास कालपासून प्रारंभ करण्यात आला. तसेच महाविद्यालये देखील सुरू झाली.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने पहिली ते बारावी, महाविद्यालयाचे वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. काही विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजावट करण्यात आली होती. काही ठिकाणी पारंपरिक आरती ओवाळून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोविड एसओपीचे पालन करून इयत्तानिहाय वर्ग भरवण्यासाठी खास वेळापत्रक विद्यालयांनी तयार केले होते, त्यानुसार वर्ग भरवण्यात आले. सर्वच शाळांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध करण्यात आला. काही विद्यालयात एका बाकावर एक विद्यार्थी, तर काही विद्यालयात एका बाकावर दोन विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली होती.

विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी काही विद्यालयात दिवसाआड वर्ग घेतले जाणार आहेत. काही विद्यालयाकडून ऑनलाइन पद्धतीचा सुध्दा वापर केला जाणार आहे. बांबोळी-कुजिरा येथील विद्यालय संकुलात मुलांना सोडण्यासाठी काल पालकांनी एकच गर्दी केली होती. मुख्य महामार्गावर बॅरिकेट्‌स असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागली. विद्यालय संकुलातून बाहेर जाण्यासाठीचा रस्ता थेट महामार्गाला जोडला असल्याने पालकांना महामार्गावरील वाहने चुकविण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने कुजिरा येथील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे राज्यातील विद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग बंद होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यात बारावी, दहावी, अकरावी, नववी, आठवी आणि सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तथापि, जानेवारी २०२२ मध्ये कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने विद्यालय आणि महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले होते. पहिली ते सहावीचे विद्यार्थी तर गेली दोन वर्षे शाळेत गेलेच नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीशी जुळवून घेताना काही दिवस कसरत करावी लागणार आहे.

काही ठिकाणी कोविड नियमांना हरताळ
शाळा सुरू झाल्या; पण ज्या शाळांत ७०० किंवा अधिक विद्यार्थी आहेत तेथे कोरोना नियम पाळणे कठीण आहे. या विद्यालयांत एका वर्गात ४० पेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात आले. तसेच एका बाकावर दोन विद्यार्थी बसविण्यात आले. बालरथात सुध्दा कोंबून विद्यार्थी बसविण्यात आले. नियम पाळण्यात न आल्याने कोरोना वाढण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

पालकांची भागशिक्षणाधिकार्‍यांंकडे तक्रार
कोविड महामारीमुळे शाळेच्या वेळेत काही अनुचित घडल्यास शाळा व्यवस्थापन जबाबदार नाही, या हमीपत्रावर सही करण्यास वास्को येथील सेंट अँड्‌यूज हायस्कूलचे शिक्षक भाग पाडत असल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी याविषयी व्यवस्थापनाला जाब विचारला; मात्र त्यांच्याकडून उलट उत्तर मिळाले. तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, असे सांगण्यात आले. पालकांनी याविषयी भागशिक्षणाधिकारी आणि शिक्षण संचालकांकडेही तक्रार केली आहे. शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांची हमी घेऊ शकत नाही, तर आम्ही कोणत्या आधारावर आमच्या मुलांना शाळेत पाठवायचे, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

हमीपत्राला पालकांसह शिवसेनेचा विरोध
राज्यातील काही विद्यालयांनी मुलांच्या सुरक्षेसाठी हमीपत्र देण्याची सूचना केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेनेही पालकांकडून हमीपत्र घेण्याच्या प्रकाराला विरोध केला आहे. विद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी विद्यालय व्यवस्थापनाची आहे; परंतु विद्यालयात येणार्‍या पाल्यांची पूर्ण जबाबदारी पालकाची असेल, असे हमीपत्र घेतले जात आहे. पालकांकडून हमीपत्र घेणार्‍या विद्यालयांवर तातडीने कारवाई करावी. शिक्षण खात्याने परिपत्रक जारी करून हमीपत्र घेण्यास मज्जाव करावा, अशी मागणी शिवसेनेचे राज्य प्रमुख जितेश कामत यांनी शिवसेना कार्यालयात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.